Saturday 29 February 2020

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेच्या कामांना गती द्या अंबड व घनसावंगी तालुक्यातील कृषि विभागातील रिक्त पदे तातडीने भरणार कृषि सेवकांच्या मानधनात वाढीसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री राजेश टोपे



            जालना, दि. 29 – शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अत्यंत उपयुक्त असुन या योजनेंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामांना गती द्यावी.  तसेच प्रत्येक कृषि सहाय्यकांनी एक गाव दत्तक घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी करावा, अशा सुचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
            येथील अंकुशनगर सहकारी साखर कारखाना येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.
            यावेळी  कृषि विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, उप विभागीय कृषि अधिकारी श्री सोनकांबळे,            श्री कोकाटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मनोज मर्कड, तालुका कृषि अधिकारी एस.व्ही. गिरी, सखाराम मोहोळ, श्री काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रमाणात संपर्क येणारा कृषी विभाग आहे.  या विभागामध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणुक द्यावी. शासकीय कार्यालयात काम करत असताना आपले वर्तन हे लोकशाहीला पोषक असे असले पाहिजे.  वेतन घेऊन जनसामान्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असुन आपल्या ज्ञानाचा फायदा जनकल्याणासाठी करावा. त्याचबरोबर विकासाची कामे करत असताना नियमानुसार व वेगाने कामे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.         घनसावंगी व अंबड तालुक्यातील कृषि विभागामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विविध पदे रिक्त आहेत.  ही सर्व पदे तातडीने भरण्यासाठी आपण मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत कृषि सेवकांना आजघडीला केवळ सहा हजार रुपये एवढे मानधन देण्यात येते. या मानधनातसुद्धा वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
            नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा  सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असुन या प्रकल्पामध्ये वैयक्तिक विकासाबरोबरच सामुहिक विकासाच्या अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत.  जालना जिल्ह्यात या योजनेंतर्गत 2 लाख 7 हजार 66 अर्जापैकी 1 लाख 31 हजार 193 अर्ज पात्र ठरली असुन विविध पातळयांवर पात्र अर्जामधील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काम करण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत आजपर्यंत 4 हजार 942 शेतकऱ्यांना 36 कोटी 33 लक्ष रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.  या प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, शेडनेट, ठिबक सिंचन यासारख्या बाबींसाठीची प्रकरणे  15 दिवसांच्या आत पुर्ण  करावीत, जिओ टॅगींगचे काम प्रत्येक कृषि सहाय्यकाने आठ दिवसात पुर्ण करावेत तर उप विभागीय स्तरावरील प्रकरणे चार दिवसात पुर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थितांना दिले.
            बैठकीस तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सेवक आदींची उपस्थिती होती.
*******




Thursday 27 February 2020

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा



जालना, दि. 27 – ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या  जन्मदिवसाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी मराठी भाषा दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियेळे, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसिलदार संतोष बनकर, श्रीमती आर.आर. महाजन यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियेळे यांनी मराठी भाषा व त्याचा वापर यावर प्रकाश टाकला.



मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी - जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे



          जालना, दि. 27 - जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे. अशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत. मराठी भाषा बोली भाषेत, लिखाणात, श्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवणे आवश्यक आहे. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले.
            जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री हजारे बोलत होते.
            यावेळी माहिती सहाय्यक अमोल महाजन, तांत्रिक सहाय्यक ज्ञानेश्वर पैठणे, शंकर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री हजारे म्हणाले, दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज  यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातुन मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जातात. शालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरावर विविध स्पर्धा, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बदलत्या काळानुसार भाषेवर भौगोलिक,राजकीय, संस्कृतिक बदलाचे परिणाम होतात. मराठी भाषेवरही ते होत आहेत. त्यामुळे ते स्वीकारत भाषा टिकवली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहचू शकते असे सांगत मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.  
            माहिती सहाय्यक श्री महाजन म्हणाले भारत देशातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनासोबतच अनेक मराठी भाषा प्रेमींकडून 27 फेब्रुवारी दिवशी 'मराठी राजभाषा दिनाचं' औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपाय, मोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगत प्रत्येकांने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापुन उदघाटन करण्यात आले. तसेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा देण्यात आली.
            कार्यक्रमास नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******






Monday 24 February 2020

*महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना* *टेंभुर्णी व तीर्थपुरी येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ*



जालना, दि. 24 - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्याच्या टेंभुर्णी तर घनसावंगी तालुक्याच्या तीर्थपुरी या गावातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्त प्रथम शेतकरी पंढरीनाथ महादू धारे यांना आधार प्रमाणित नोंद प्रमाणपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ आज         दि. 24 फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथील आपले सरकार सेवा केंद्र येथे करण्यात आला. 
  यावेळी सहाय्यक निबंधक श्रीमती कल्पना शहा, चेअरमन रावसाहेब अंभोरे, जिल्हा सहकारी बँकेचे भागचौकसनिस देविदास दंदाले, गटसचिव गणेश चव्हाण, विष्णू डोईफोडे, भुंजगराव पिंपळे, शालिक बनकर, सरपंच गणेश धनवाई, भिकन खाँ पठाण, अंकुश देशमुख, हरिभाऊ सोनसाळे, गोरखनाथ राऊत आदींची उपस्थिती होती. 
  महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यातील टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील आधार प्रमाणिकरण कामाची पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील प्रत्येकी 551 अशा एकुण 1 हजार 102 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या दोन गावातील यादी प्रसिद्धीनंतर काही अडचणी  असतील तर त्याची माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहितीची खातरजमा करुन कर्जमुक्तीसाठी सहमती दर्शवायची आहे.  जिल्ह्याभरातील सर्व गावांची अंतिम यादी येत्या 28 किंवा 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. 
*******



Thursday 13 February 2020

कृषिविषयक माहितीबाबत शेतकऱ्यांसाठी फार्ममित्र-केयरिंगली योर्स ॲप विकसित अपॅच्या माध्यमातुन कृषिविषयक व पीकविम्याची मिळणार माहिती



            जालना,दि.13 :  शेतकऱ्यांना कृषिविषयक सर्व माहिती एका क्लिकच्या माध्यमातुन मिळावी या उद्देशाने बजाज अलियान्झ या कंपनीमार्फत फार्ममित्र-केयरिंगली योर्स  (farmitra-caringly yours) नावाने ॲप तयार करण्यात आले असुन शेतकऱ्यांना कृषिविषयक माहिती मिळण्याबरोबच याबाबत त्यांच्या असलेल्या अडी-अडचणींची सोडवणुक करण्यासाठीही हे ॲप अतिशय उपयुक्त  आहे.
फार्ममित्र-केयरिंगली योर्स या ॲपच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना हवामानाची स्थिती, पाऊस पडण्याची शक्यता, तापमानातील चढ-उतार, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यासह हवामानातील नवीन माहिती शेतकऱ्यांना मिळण्याबरोबरच स्थानिक हवामान, मातीचे गुणधर्म, पेरणीच्या तारखा, विशिष्ट उत्पादनाच्या किंमतीची माहिती, शेतीच्या ताज्या घडामोडी, चांगल्या शेती पद्धती, शासकीय योजनांची माहिती, कृषिविमा आणि कर्ज याबाबतीमधील माहितीही प्रादेशिक भाषेत उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर फार्ममित्र-केयरिंगली योर्स (farmitra-caringly yours) या ॲपद्वारे शेतकऱ्यांना विमा संबंधित सर्व माहितीही मिळु शकणार असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा. 
-*-*-*-*

Monday 10 February 2020

शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसुल व बँक अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे - पालकमंत्री राजेश टोपे


            जालना, दि. 10 –  सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानुन राज्य शासन काम करत आहेसर्वसामान्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत त्वरेने पोहोचविण्यासाठी महसुल विभाग व बँकांनी समन्वयाने काम करावेतसेच विविध शासकीय कार्यालये, बँकांमध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाची वागणुक देण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
            जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले होतेत्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.
            यावेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधीक्ष कृषि अधिकारी बाबासाहेब शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आशुतोष देशमुख, मनोज मरकड, सतीष होंडे, कल्याण सपाटे, भाऊसाहेब कणके, राजेंद्र कोल्हे, बाळासाहेब नरवडे यांच्यासह सर्व तालुक्याचे तहसिलदार, बँकांचे व्यवस्थापक आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, दुष्काळी अनुदान न मिळाल्याच्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेतदुष्काळी अनुदानाची रक्कम प्रशासनाकडे उपलब्ध झाली असल्यास या निधीचे प्राधान्याने वितरण करण्यात यावेनिधी संदर्भात काही अडचण असल्यास मंत्रालयीन स्तरावर त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            पीएम किसान योजनेंसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, या योजनेंतर्गत तीन टप्प्यांमध्ये लाभार्थी कुटूंबाला 6 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येतेज्या शेतकऱ्यांचे आधारलिंक, बँकखाते क्रमांक आयएफएससी क्रमांक चुकीचा नोंदविल्यामुळे योजनेच्या लाभापासुन अनेक लाभार्थी वंचित आहेत. या सर्व तांत्रिक बाबींची तातडीने पुर्तता करुन या योजनेच्या लाभापासुन एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
            निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नापिकीचा सामना करावा लागल्याने शेतीसाठी घेण्यात आलेले पीककर्ज फेडण्यासाठी शेतकरी राजा असमर्थ ठरला. या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असुन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ची घोषणा शासनाने केली आहे. या योजनेचा लाभ जिल्हयातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला देण्यासाठी सर्वांचे आधार क्रमांक तातडीने लिंक करुन घेण्यात यावेतजे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये तसेच 2 लाख रुपयांच्यावर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे अशा शेतकऱ्यांकडून दोन लाखाच्या वरील रक्कम भरुन घेत या कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            संजय गांधी निराधार श्रावणबाळ  योजनेसंदर्भात आढावा घेताना जिल्ह्यातील प्रत्येक गरजु पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजेया योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान दरमहा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी ऑक्टोबर, 2019 महाचक्रीवादळामुळे झालेले नुकसानीचे निधी वाटप, खरीप अनुदान यासह ईतर विषयांचा विस्तृत आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सुचना केल्या


Wednesday 5 February 2020

कोरोना उपचाराबाबत समाजमाध्यमांवरील संदेशांना शास्त्रीय आधार नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन


             मुंबई, दि. 5 : कोरोना व्हायरसमुळे झालेला आजार बरा करण्याकरीता समाजमाध्यमांमध्ये सध्या जे संदेश फिरत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या संदेशांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. आरोग्य विभागामार्फत असे संदेश दिले नाहीत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.
            लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमुत्र आदींच्या सेवनामुळे कोरोना व्हायरसवर उपचार शक्य असल्याचा संदेश वेगवेगळ्या डॉक्टरांच्या नावाने आणि आरोग्य विभागाचे नाव टाकून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. हे संदेश पूर्णपणे चुकीचे असून त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. दिशाभूल करणाऱ्या या संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. ताजे अन्न, स्वच्छ व पूर्णपणे शिजविलेले अन्न खावे, पोषक आहार घ्यावा, हात धुवावेत, सर्दी किंवा खोकला झाला असल्यास नाका तोंडावर रुमाल ठेवून शिंकावे अशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत.
            कोरोनावर कुठलेही एक विशिष्ट औषध उपचार म्हणून नसून लक्षणांवर औषधोपचार केला जातो, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले.



माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहाचा विस्तार संपुर्ण देशभरात अधिक प्रमाणात वाढावा - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी


            जालना, दि. 5 –  आजची बालके हे उद्याच्या देशाचे भविष्य आहे.  गुणवत्तापुर्ण शिक्षण व पौष्टीक आहाराच्या माध्यमातुन संस्कारक्षम व बलवान पिढी घडत असते. समाजभावनेतुन बालकांसाठी सुरु करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहाचा विस्तार संपुर्ण देशभरात अधिक प्रमाणात वाढावा, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.
            महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी लि. व अन्न अमृत फाऊंडेशन यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन योजनेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज गोल्डन ज्युबली स्कुल परिसरात करण्यात आले.  त्याप्रंसगी मार्गदर्शन करताना राज्यपाल  श्री. कोश्यारी बोलत होते.
            यावेळी महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, अन्नामृत फाऊंडेशनचे राधाकृष्ण दास,महिको मॉन्सेन्टो कंपनीचे आशिया खंड विभागाचे प्रमुख सिमोन थोरस्टेड विबुस्च,  आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, नगरध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकजन केवळ स्वत:साठी जगत असतो. परंतू सर्वश्रेष्ठ तोच व्यक्ती आहे जो दुसऱ्यांसाठी जगतो.  समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या भावनेतुन जगणे म्हणजे श्रेष्ठ असल्याचे सांगत अन्नामृत फाऊंडेशनचे राधाकृष्ण दास, व महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले यांनी समाजातील एकही बालक भुकेले राहू नये या दृष्टीकोनातुन माध्यान्ह भोजन योजनेतून बालकांना स्वादिष्ट व पौष्टीक आहार उपलब्ध करुन देत असुन त्यांच्या या कार्याचा समाजातील प्रत्येकाने आदर्श घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            अन्न अमृत फाऊंडेशनच्या माध्यमातून 21 माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहे चालविण्यात येत असुन 22 व्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे लोकार्पण आज येथे करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले म्हणाले, बालकांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शिक्षणाबरोबरच पौष्टीक आहार आवश्यक आहे.  अन्नामृतच्या माध्यमातुन देशभरातील 13 लक्ष् बालकांना तर जिल्ह्यातील 50 हजार बालकांना अन्न उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील एक लक्ष बालकांना अन्न उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे सांगत पद्मश्री डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी पाहिलेले स्वप्न आज या निमित्ताने पुर्ण होत असल्याचे सांगत या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राधाकृष्ण दास यांनी अन्नामृत फाऊंडेशन करत असलेल्या कार्याची विस्तृत अशी माहिती दिली.  यावेळी महिको मॉन्सेन्टो कंपनीचे आशिया खंड विभागाचे प्रमुख सिमोन थोरस्टैड विबुस्च, नगरध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल यांनीही मनोगत व्यक्त केले.
            तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहाची पहाणी करुन विद्यार्थ्यांना स्वत: भोजन वाढले.  कार्यक्रमादरम्यान केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रावसाहेब दानवे तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांचे शुभेच्छा संदेशही उपस्थितांना दाखविण्यात आले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला यांची उप‍स्थिती होती. *******