Thursday 27 February 2020

मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी - जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे



          जालना, दि. 27 - जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे. अशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत. मराठी भाषा बोली भाषेत, लिखाणात, श्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवणे आवश्यक आहे. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले.
            जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री हजारे बोलत होते.
            यावेळी माहिती सहाय्यक अमोल महाजन, तांत्रिक सहाय्यक ज्ञानेश्वर पैठणे, शंकर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री हजारे म्हणाले, दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज  यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातुन मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जातात. शालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरावर विविध स्पर्धा, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बदलत्या काळानुसार भाषेवर भौगोलिक,राजकीय, संस्कृतिक बदलाचे परिणाम होतात. मराठी भाषेवरही ते होत आहेत. त्यामुळे ते स्वीकारत भाषा टिकवली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहचू शकते असे सांगत मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.  
            माहिती सहाय्यक श्री महाजन म्हणाले भारत देशातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनासोबतच अनेक मराठी भाषा प्रेमींकडून 27 फेब्रुवारी दिवशी 'मराठी राजभाषा दिनाचं' औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपाय, मोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगत प्रत्येकांने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापुन उदघाटन करण्यात आले. तसेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा देण्यात आली.
            कार्यक्रमास नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******






No comments:

Post a Comment