Saturday 29 February 2020

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेच्या कामांना गती द्या अंबड व घनसावंगी तालुक्यातील कृषि विभागातील रिक्त पदे तातडीने भरणार कृषि सेवकांच्या मानधनात वाढीसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री राजेश टोपे



            जालना, दि. 29 – शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अत्यंत उपयुक्त असुन या योजनेंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामांना गती द्यावी.  तसेच प्रत्येक कृषि सहाय्यकांनी एक गाव दत्तक घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी करावा, अशा सुचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
            येथील अंकुशनगर सहकारी साखर कारखाना येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.
            यावेळी  कृषि विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, उप विभागीय कृषि अधिकारी श्री सोनकांबळे,            श्री कोकाटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मनोज मर्कड, तालुका कृषि अधिकारी एस.व्ही. गिरी, सखाराम मोहोळ, श्री काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रमाणात संपर्क येणारा कृषी विभाग आहे.  या विभागामध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणुक द्यावी. शासकीय कार्यालयात काम करत असताना आपले वर्तन हे लोकशाहीला पोषक असे असले पाहिजे.  वेतन घेऊन जनसामान्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असुन आपल्या ज्ञानाचा फायदा जनकल्याणासाठी करावा. त्याचबरोबर विकासाची कामे करत असताना नियमानुसार व वेगाने कामे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.         घनसावंगी व अंबड तालुक्यातील कृषि विभागामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विविध पदे रिक्त आहेत.  ही सर्व पदे तातडीने भरण्यासाठी आपण मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत कृषि सेवकांना आजघडीला केवळ सहा हजार रुपये एवढे मानधन देण्यात येते. या मानधनातसुद्धा वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
            नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा  सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असुन या प्रकल्पामध्ये वैयक्तिक विकासाबरोबरच सामुहिक विकासाच्या अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत.  जालना जिल्ह्यात या योजनेंतर्गत 2 लाख 7 हजार 66 अर्जापैकी 1 लाख 31 हजार 193 अर्ज पात्र ठरली असुन विविध पातळयांवर पात्र अर्जामधील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काम करण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत आजपर्यंत 4 हजार 942 शेतकऱ्यांना 36 कोटी 33 लक्ष रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.  या प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, शेडनेट, ठिबक सिंचन यासारख्या बाबींसाठीची प्रकरणे  15 दिवसांच्या आत पुर्ण  करावीत, जिओ टॅगींगचे काम प्रत्येक कृषि सहाय्यकाने आठ दिवसात पुर्ण करावेत तर उप विभागीय स्तरावरील प्रकरणे चार दिवसात पुर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थितांना दिले.
            बैठकीस तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सेवक आदींची उपस्थिती होती.
*******




No comments:

Post a Comment