Sunday 14 May 2017

विकासाचा वेग वाढविण्यासाठी गावागावात जाऊन शेतक-यांशी संवाद साधने आवश्यक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जालना,दि,13:- राज्यात विकासाचा वेग वाढविण्यासाठी गावागावात जाऊन शेतक-यांशी संवाद साधणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव आदर्श ग्राम येथे आयोजित गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार कामाच्या  शुभारंभ कार्यक्रमात  ते  बोलत होते.
            कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्हयाचे  पालकमंत्री  बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे,आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे,मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रविण  सिंह परदेशी, जिल्हाधिकारी शिवाजी जोधंळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शेती ही नवीन योजना आता सुरु केली आहे. या योजनेत धरणातील,नदीतील गाळ बाहेर काढून तो गाळ शेतीत टाकून शेती समृध्द बनवा. या गाळामध्ये सत्व असल्यामुळे हा गाळ शेतीसाठी फार उपयुक्त  आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते.
            खासगावमध्ये बांधण्यात आलेल्या  सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम उत्तम प्रकारे झाले असून या सार्वजनिक स्वच्छता गृहाचा  पॅटर्न राज्यात  सर्वत्र राबविल्या जावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी  जलयुक्त शिवार अभियान सुरु केले असून नदी,नाले खोलीकरणाची कामे मोठया प्रमाणावर सुरु आहेत. शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यात सुरु आहे. राज्य शासन शेतक-यांच्या सदैव पाठीशी असून शेतक-यांनी कृषी विषयक सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            राज्यात येत्या 31 मे पर्यंत 1 लाख टन तूर खरेदी केली जाणार आहे. राज्यातील गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. देशात एका वर्षात अडीच लाख घरे बांधण्यात आली असून देशात यंदाचे वर्ष हे गरीब कल्याण वर्ष म्हणून राबविण्यात येत आहे असे ते म्हणाले.
            जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर आपल्या मनोगतात म्हणाले की, राज्यात सहा हजार टॅंकर्स व्दारे पाणीपुरवठा करुन पाणी टंचाई दूर केली. लातूरमध्ये रेल्वे व्दारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाने  पाण्याचा थेंबनथेंब वाचविला  पाहिजे, गावागावात पाणी आडविले जावून मोठया प्रमाणावर पाणी साठविले  पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यात 15 हजार गावात पाणी साठविण्यासाठी स्टोरेज निर्माण केले गेले आहेत. राज्यात आतापर्यत पाणी पुरवठा योजनेसाठी अडीच हजार कोटी  रुपये खर्च केले गेले आहेत. मराठवाडयातील जनतेसाठी गुजरात,तेलंगानाच्या धर्तीवर वाटर ग्रीड प्रकल्प सुरु केला. राज्यात आतापर्यंत 11 जिल्हयात 150 तालुके हागणदारीमुक्त झाले असून राज्य शासन जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवित आहेत,असे त्यांनी यावेळी  सांगितले. देशात सुरु असलेल्या उज्वला गॅस योजनेतंर्गत खासगांव येथील शेतक-यानां प्रातिनिधीक स्वरुपात स्वयंपाकासाठीच्या गॅस कनेक्शनचे वाटप यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस  यांच्या हस्ते करण्यात आले.
             
            कार्यक्रमाच्या सुरुवातील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी खासगांव आदर्श ग्राममध्ये जलयुक्त शिवार अभियानातंर्गत कामाची पाहणी, स्वच्छ भारत अभियानातंर्गत बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाची पाहणी, प्रधानमंत्री आवासयोजना कामांची पाहणी केली. कार्यक्रमास खासदार रावसाहेब दानवे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आमदार संतोष दानवे यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे यांनी  आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला खासगांव परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर खासगांव परिसरातील रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणी  मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी भेट देऊन रोजगार हमीच्या मजुरांशी संवाद साधला आणि याबाबत   त्यांनी समाधान व्यक्त केले.
*******





गाळातील सत्वामुळे उत्पादकतेत भरमसाठ वाढ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जालना,दि,13:-  गाळमुक्त धरण- गाळमुक्त शिवार उपक्रमामुळे गाळातील सत्वाचा फायदा पिकाला होऊन उत्पादकतेत भरमसाठ वाढ होणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
             जाफ्राबाद तालुक्यातील शिंदी या गावच्या परिसरातील लघुसिंचन तलावाच्या गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार उपक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर ,खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, नारायणराव कुचे,जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊसाहेब लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            गाळ वाहून नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च शासन करणार आहे, आता फक्त या कार्यक्रमाला  लोकांचा आधार लागणार आहे. यामुळे यावर्षी तलाव- प्रकल्पांत दुप्पट पावसाचे पाणी साठणार आहे असा आशावाद व्यक्त करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदी गावाला पुढच्या वर्षी साठलेले पाणी पाहण्यासाठी पुन्हा येईल  अशी ग्वाही दिली. तलाव प्रकल्पातील गाळ शेतक-यानां मोफत नेता येईल. सर्व व्यवस्था राज्य शासन करणार असल्याने याकामी आता लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम नमूद केले.
            राज्यात 20 ते 22 हजार गावे दुष्काळाचा सामना करतात, त्यासाठी मागील दोन वर्षापूर्वी जलयुक्त शिवार आभियान शाश्वत शेतीसाठी सुरु केले. यामध्ये पावसाचा प्रत्येक थेंब माझ्या मालकीचा आहे असे समजून तो जागेवरच आडविला पाहिजे अशी भूमिका शेतक-यांनी बाळगावी असेही आवाहन शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            प्रारभी खासदार रावसाहेब दानवे यांनी शिंदी या शेवटच्या टोकावर असलेल्या गावांत देखील गाळयुक्त धरण-गाळमुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करुन शेतक-यांना दिलासा  दिल्याचे सांगितले. गावक-यातर्फे मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळ वाहून नेणा-या ट्रॅक्टर्सना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ्‍ केला.
            आगमन होताच जलसंपदा विभागाचे अधिकारी यशवंत गच्चे, कविराज कुच्चे यांनी स्वागत केले. या तलावातून 12 हजार क्यूबीक मीटर गाळ काढल्याचे नियोजन आहे.
*******  

       

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाची पहाणी



जालना, दि. 13 – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जालना औरंगाबाद रोडवर सुरु असलेल्या आयेशा टाऊनशिप या प्रकल्पास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट देऊन प्रकल्पाची पहाणी केली.
          यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आयेशा टाऊनचे संचालक धिरेंद्र मेहरा, शैलेंद्र मेहरा, अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
          पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत जालना शहरालगत आयेशा टाऊनशिप प्रकल्प साकारला जात आहे.  या ठिकाणी सर्वसोईंनीयुक्त अशा 266 सदनिकांची उभारणी करण्यात येत असुन  मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पाची पहाणी करत नमुना सदनिकेचे उदघाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आयेशा टाऊनशिप यांच्यामार्फत गरीबांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या घरांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगत जिल्ह्यात गरीबांसाठी अशा पद्धतीच्या घरांची मोठ्या प्रमाणात उभारणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन प्रकल्पाचे संचालक श्री मेहरा यांना शुभेच्छा दिल्या.
*******




भविष्यातील जालना अतिशय उत्तम बनवू --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे



          जालना, दिनांक 13 – रस्ते, पाणी या मुलभूत गरजांबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा सुयोग्य वापर आणि भूयारी गटारांच्या सुविधांबरोबरच भविष्यात जालना शहर अतिशय उत्तम शहर असेल. त्याकरीता सर्वोतोपरी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, यासाठी एकत्रितपणे येऊन शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 
         महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत जालना शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज मामा चौक येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,  आमदार अतुल सावे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, औरंगाबादचे महापौर भगवान घडमोडे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अरविंद चव्हाण,रामेश्वर भांदरगे, भास्कर आंबेकर आदींची उपस्थिती होती.     
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मोठ्या जलसमस्येतून जालना शहर मुक्त झाले आहे. जालना शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेऊन विकासासाठी पुढे यावे. देशात महाराष्ट्राचे मोठ्याप्रमाणात शहरीकरण झाले आहे. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकाने शहरीकरणाचा स्वीकार करण्याचे सांगून शहरांना स्मार्ट करण्यासाठी विविध योजनांची निर्मिती केली. स्मार्ट शहर, अटल अमृत शहर योजना, 14 व्या वित्त आयोगाच्या आदी विविध योजनांच्या माध्यमातून निधीची  व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
          गेल्या दोन वर्षात शहर विकासासाठी 21 हजार कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे. मागील सात आठ वर्षात बंद पडलेल्या 8 हजार कोटींच्या 150 योजना तीन वर्षात सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, भूयारी गटारे, सांडपाण्यावर प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा आवश्यक तेवढा निधी सरकार उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
             प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक झोपडपट्टीतील गरिबाला घराची उपलब्धता करून देण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी मुख्याधिकारी यांना दिलेत. त्याचबरोबर देशातील नामांकित, आंतरराष्ट्रीय संस्था असलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून जालन्यात जगभरातील उद्योग याठिकाणी येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जालन्यातील सीडपार्कबाबत लवकरच जागेचे संपादन करण्यात येईल, समृद्धी महामार्ग जालना आणि औरंगाबादसाठी फायदेशीर आहे, असेही त्यांनी सांगितले.
          पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही यावेळी जालन्याच्या विकासकामांबाबत माहिती देऊन पुढील तीन वर्षात मराठवाडा वॉटर ग्रीड होईल, असे सांगितले. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक करून महात्मा फुले मार्केटचा विषय मार्गी लावण्यावर भर द्यावा, असे सांगितले. यावेळी खासदार रावसाहेब दानवे यांनीही विकासकामांबाबत माहिती देऊन जालना पहिला ड्रायपोर्ट जिल्हा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी मदत करत असल्याचे ते म्हणाले. आमदार राजेश टोपे यांनीही विचार मांडले. यामध्ये त्यांनी पाणी पुरवठा योजनेचे कौतुक केले.
        छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव समितीच्यावतीने 35 हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला. यावेळी आयएमए संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
            तसेच प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्याहसते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाल-श्रीफळ देऊन, मान्यवरांचा पालिकेतर्फे शाल-श्रीफळ  देऊन सत्कार करण्यात आला.
         जालना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांबाळे  यांचा देशात प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कागदपत्रे हस्तांतरित
देशातील क्रमांक एकची संस्था असलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना जिल्ह्यातील सिरसवाडी येथे उभारण्यात येणा-या शाखेच्या परिसराकरीता 203 एकर जमिनीच्या कागदपत्रांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते तंत्रशिक्षण विभागाच्या डॉ. स्मिता लेले, महेश शिवणकर, तसेचमुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी आशीष मंत्री, मनोज पांगरकर यांच्याकडे करण्यात आले आहे.
                                                     *******