Sunday 14 May 2017

विकासाचा वेग वाढविण्यासाठी गावागावात जाऊन शेतक-यांशी संवाद साधने आवश्यक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जालना,दि,13:- राज्यात विकासाचा वेग वाढविण्यासाठी गावागावात जाऊन शेतक-यांशी संवाद साधणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव आदर्श ग्राम येथे आयोजित गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार कामाच्या  शुभारंभ कार्यक्रमात  ते  बोलत होते.
            कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्हयाचे  पालकमंत्री  बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे,आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे,मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रविण  सिंह परदेशी, जिल्हाधिकारी शिवाजी जोधंळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शेती ही नवीन योजना आता सुरु केली आहे. या योजनेत धरणातील,नदीतील गाळ बाहेर काढून तो गाळ शेतीत टाकून शेती समृध्द बनवा. या गाळामध्ये सत्व असल्यामुळे हा गाळ शेतीसाठी फार उपयुक्त  आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते.
            खासगावमध्ये बांधण्यात आलेल्या  सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम उत्तम प्रकारे झाले असून या सार्वजनिक स्वच्छता गृहाचा  पॅटर्न राज्यात  सर्वत्र राबविल्या जावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी  जलयुक्त शिवार अभियान सुरु केले असून नदी,नाले खोलीकरणाची कामे मोठया प्रमाणावर सुरु आहेत. शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यात सुरु आहे. राज्य शासन शेतक-यांच्या सदैव पाठीशी असून शेतक-यांनी कृषी विषयक सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            राज्यात येत्या 31 मे पर्यंत 1 लाख टन तूर खरेदी केली जाणार आहे. राज्यातील गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. देशात एका वर्षात अडीच लाख घरे बांधण्यात आली असून देशात यंदाचे वर्ष हे गरीब कल्याण वर्ष म्हणून राबविण्यात येत आहे असे ते म्हणाले.
            जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर आपल्या मनोगतात म्हणाले की, राज्यात सहा हजार टॅंकर्स व्दारे पाणीपुरवठा करुन पाणी टंचाई दूर केली. लातूरमध्ये रेल्वे व्दारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाने  पाण्याचा थेंबनथेंब वाचविला  पाहिजे, गावागावात पाणी आडविले जावून मोठया प्रमाणावर पाणी साठविले  पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यात 15 हजार गावात पाणी साठविण्यासाठी स्टोरेज निर्माण केले गेले आहेत. राज्यात आतापर्यत पाणी पुरवठा योजनेसाठी अडीच हजार कोटी  रुपये खर्च केले गेले आहेत. मराठवाडयातील जनतेसाठी गुजरात,तेलंगानाच्या धर्तीवर वाटर ग्रीड प्रकल्प सुरु केला. राज्यात आतापर्यंत 11 जिल्हयात 150 तालुके हागणदारीमुक्त झाले असून राज्य शासन जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवित आहेत,असे त्यांनी यावेळी  सांगितले. देशात सुरु असलेल्या उज्वला गॅस योजनेतंर्गत खासगांव येथील शेतक-यानां प्रातिनिधीक स्वरुपात स्वयंपाकासाठीच्या गॅस कनेक्शनचे वाटप यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस  यांच्या हस्ते करण्यात आले.
             
            कार्यक्रमाच्या सुरुवातील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी खासगांव आदर्श ग्राममध्ये जलयुक्त शिवार अभियानातंर्गत कामाची पाहणी, स्वच्छ भारत अभियानातंर्गत बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाची पाहणी, प्रधानमंत्री आवासयोजना कामांची पाहणी केली. कार्यक्रमास खासदार रावसाहेब दानवे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आमदार संतोष दानवे यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे यांनी  आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला खासगांव परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर खासगांव परिसरातील रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणी  मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी भेट देऊन रोजगार हमीच्या मजुरांशी संवाद साधला आणि याबाबत   त्यांनी समाधान व्यक्त केले.
*******





No comments:

Post a Comment