Sunday 14 May 2017

शासनाच्या महत्वाकांक्षी विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



जालना, दि. 13 –   राज्य शासनाचा महत्वाकांक्षी व शाश्वत पाण्यासाठी राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना या विकास योजनांची कामे जलदगतीने होण्यासाठी या योजना मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
          जाफ्राबाद येथील तहसिल कार्यालयात जालना जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून घेतला.
          याप्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदींची उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामधील कामांचे पावसाळयापूर्वी नियोजन करण्यात यावे.  तसेच गतवर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.   येत्या 2 ऑक्टोबर, 2017 पर्यंत महाराष्ट्र राज्य ओडीएफ करण्याचा संकल्प करण्यात आला असून जालना जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या शौचालयांच्या उभारणीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
          यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व
गाळयुक्त शिवार, कृषीपंपांना वीजजोडणी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), पीककर्ज वाटप, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सीडस् पार्क, ड्रायपोर्ट, गटशेती आदी कामांची माहिती तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय घेऊन अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पॉवर पाँईटच्या माध्यमातुन जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.  
गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
          जाफ्राबाद तालुक्यात गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी बैठकीनंतर संवाद साधला.  यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,  गटशेतीचा अंतर्भाव या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला असुन शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारावर व शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे.  जाफ्राबाद तालुक्यातील गटशेती करणारे शेतकरी  गटशेतीचे ब्रँड ॲम्बेसेडर व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करत या शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
          गटशेती प्रमुख लक्ष्मण सवडे यांनी गटशेतीअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्यासमोर सादर केली.         या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उप विभागीय, अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
***-***


No comments:

Post a Comment