Sunday 30 April 2017

जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे मराठवाड्यातील जनतेला एकाच योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार- पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना, दि. 1 –  महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनाद्वारे स्वच्छतेचा संदेश गावोगावी दिला आहे. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी  यांनीही संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असुन येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यासह जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दारी शौचालयाची उभारणी करुन त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थितांना शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आमदार अरविंद चव्हाण,  जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, उप विभागीय अधिकारी केशव नेटके,घनश्याम गोयल, सतीष अग्रवाल, सुरेंद्र पित्ती, विरेंद्र धोका, श्रीमती आशा दानवे, एकबाल पाशा, भुजंगराव गोरे आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  राज्यातील ११ जिल्हे १४८ तालुके व १६३६० ग्राम पंचायती हागणदारी मुक्त झाले आहेत. मराठवाड्यात सर्वप्रथम परतूर व जाफ्राबाद हे दोन तालुके हागणदारी मुक्त झाले असुन मंठा तालुका हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. येणाऱ्या काळात जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.   
            जालना जिल्ह्याचा विकास अधिकगतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असुन मराठवाड्यासह जिल्ह्यातील जवळपास 40 हजार लोकांना रोजगार देऊ शकणाऱ्या आणि सुमारे 6 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या 109 कोटी रुपये गुंतवणुकीचा सीडपार्क जालना परिसरात करण्यास अलिकडेच मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.  या सीडपार्कमुळे बियाणे उद्योगासमोरील अडचणी दूर करण्याबरोबरच पायाभुत सुविधांचा विकास करुन बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्मितीद्वारे रोजगार आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे सांगत मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांना रसायन तंत्रज्ञानाबाबत शिक्षण घेता यावे यासाठी जिल्ह्यातील सिरसवाडी येथील गट नं. 132 मधील 200 एकरवर शासनाच्या अधिपत्याखाली अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणाऱ्या रसायन तंत्रज्ञान महाविद्यालय उभारण्यासही मंत्री मंडळाने मान्यता दिली असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जालना, परतूर व मंठा तालुक्यातील 176 गावांना ग्रीडद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांचा निधीतून योजना साकारण्यात येत आहे. योजनेचे काम जलदगतीने करण्यात येत असुन येत्या दोन वर्षात ही योजना पूर्ण होऊन नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असुन संपूर्ण मराठवाड्याला वॉटरग्रीडने पाणी पुरवठा करण्याबरोबरच शेतीला व उद्योगालाही पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मंत्री मंडळासमोर मांडण्यात आला होता. या योजनेचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्टर रिपोर्ट) सादर करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असुन येणाऱ्या काळात या योजनेच्या माध्यमातुन मराठवाड्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  
            सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच झालेल्या नागरी सेवा दिनी  नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचा सन्मान करण्यात आला.  जिल्ह्यासाठी ही भुषणावह बाब असुन जिल्हाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात जालना जिल्हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहावा यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाने व एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजही अनेक कुटूंबांना स्वत:च्या हक्काचे घर नाही.  देशातील प्रत्येक नागरिकाला स्वत:च घर मिळावं या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातुन 2022 पर्यंत प्रत्येकाला घर उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे.  जालना शहरात या योजनेंतर्गत 364 सदनिकांची म्हाडामार्फत उभारणी करण्यात येत आहे.  दुर्बल घटकातील व अल्पउत्पन्न असणाऱ्यांना या ठिकाणी सर्वसोईंनीयुक्त असे घरे देण्यात येणार असुन या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, मलनिस्सारण व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.   या घरासाठी केंद्र शासन 1 लाख 50 हजार, राज्य शासन एक लाख असे एकूण 2 लाख 50 हजारांची सबसिडी देण्यात येणार आहे.  तसेच उर्वरित रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  येणाऱ्या काळात जिल्ह्यातील दुर्बल व अल्पउत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या हक्काचे घर मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणारअसल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            सातत्याने निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करुन शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासुन राज्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये 212 तर 2016-17 या वर्षामध्ये 186 गावांची निवड करण्यात येऊन जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत.  जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे जवळपास 50 हजार 17 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला असुन पाणी पातळीमध्ये 2.25 मीटरने वाढ झालेली आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावामधुन हे अभियान यशस्वीरित्या राबवुन जालना जिल्हा टंचाईमुक्त करण्याचा मानस असुन या कामांमध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा. तसेच पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातुन जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच शाश्वत सिचंनाची सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यात गतवर्षात या योजनेच्या माध्यमातुन  9 हजार 602 शेतकऱ्यांना शेततळे मंजुर करण्यात आले असुन 2 हजार 729 शेततळयांचे काम पूर्ण करण्यात आले असुन उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            श्यामाप्रसाद रुरबन योजनेमध्ये परतूर तालुक्यातील आष्टीसह 15 गावांचा समावेश करण्यात आला असुन 170 कोटी रुपयांच्या या योजनेमधून या गावात पालिकाक्षेत्राप्रमाणे नागरी सुविधा देऊन विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांचा सत्कार
            सन 2016-17 या वर्षात जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून खरीपात 4 लाख 69 हजार आणि रब्बी मध्ये 1 लाख 27 हजार शेतक-यांनी 39 कोटी रुपयांचा विमाहप्ता भरुन पिकविमा योजनेत भाग घेत जालना जिल्हा देशात प्रथम आल्याबद्दल जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जालना येथील पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह यांची बदली पुणे येथे झाली असुन त्यांनी जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था यशस्वीपणे अबाधित राखल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंठा व बदनापूर तालुके 100 टक्के ओडीएफ केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांचाही मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्मार्ट ग्रामअंतर्गत गावचे सरपंच तसेच औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सुक्ष्म व लघु उद्योजकांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
            कार्यक्रमाचे संचलन निशिकांत मिरकले यांनी केले.  कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, पत्रकार,विद्यार्थी, विद्यार्थीनीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.         
*******
जिल्हाधिकारी कार्यालयात
जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
            जालना,दि.1- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, उप‍ विभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा कोषागार अधिकारी  श्री पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप, तहसिलदार श्रीमती अनिता भालेराव  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

*******


No comments:

Post a Comment