Thursday 20 April 2017

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये देशात जालना जिल्हा प्रथम नागरी सेवादिनी पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली येथे जिल्हाधिकारी स्वीकारणार पुरस्कार

जालना  -  सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असुन शुक्रवार दि. 21 एप्रिल, 2017 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवादिनाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे यावेळी पारितोषिक स्वीकारणार आहेत.
          राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर तसेच खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात उत्तमरित्या व्हावी व शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम केल्यामुळे संपूर्ण देशातुन जिल्हाला हा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
          जिल्हयात 2015-16 या वर्षी खरीपात एकूण रु. 25 कोटी विमा हप्ता भरुन पिक विमा घेतलेल्या जिल्हयातील जवळपास 95 टक्के शेतक-यांना  रु. 431 कोटी 64 लाख रुपये  आणि रब्बी मध्ये एकुण  2 कोटी विमा हप्ता भरून पिक विमा घेतलेल्या शेतक-यांना                   44 कोटी 29 लाख रुपये कोटी इतकी नुकसान भरपाई मिळाली. सन 2016-17 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातुन खरीपात 4 लाख 69 हजार आणि रब्बी मध्ये 1 लाख 27 हजार शेतक-यांनी 39 कोटी रुपयांचा विमाहप्ता भरुन पिकविमा योजनेत भाग घेतल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.  
          जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषि अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी,कर्मचारी,सर्व तहसिलदार, तलाठी ग्रामसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नातून व माहिती व जनसंपर्क विभाग व सर्व प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या योगदानामुळे हे शक्य झाले, असल्याची भावना जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी व्यक्त केली.
          भारत सरकारमार्फत केंद्र पुरस्कृत काही महत्वपूर्ण योजनांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हयांना प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार दिला जातो.  त्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा समावेश आहे.  या योजनेतून पुरस्कार मिळण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांनी अर्ज केले होते.  याची प्राथमिक छाननी होऊन बारा जिल्ह्यांना सादरीकरणासाठी दिल्ली येथे बोलावण्यात आले होते.  याचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दि. 14 फेब्रुवारी, 2017 रोजी दिल्ली येथे केले. तदनंतर दुसऱ्या छानणीत चार जिल्ह्यांना पुन्हा दिल्लीत सादरीकरणासाठी बोलावण्यात आले.  दि.  9 मार्च, 2017 रोजी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दिल्ली येथे सादरीकरण केले होते.
          या पुरस्कार सोहळयाचे थेट प्रक्षेपण दि. 21 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 11-00 वाजता दुरदर्शनच्या डी.डी वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.  या सोहळया दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जालना जिल्ह्यातील काही निवडक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.  या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक जनतेने घ्यावा, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

*******

No comments:

Post a Comment