Tuesday 6 June 2017

समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध-- केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान

जालना -   समाजातील सर्वसामान्य तसेच तळागाळातील व्यक्तीला केंद्रबिंदू मानून केंद्र शासनाने गत तीन वर्षात अनेकविध कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या.  येणाऱ्या काळात समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होऊन त्यांचे जीवनामान उंचावण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्री धमेंद्र प्रधान यांनी केले.
            केंद्र शासनाच्या तीन वर्षेपूर्तीनिमित्त जालना शहरातील हॉटेल गॅलेक्सी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधताना मंत्री धमेंद्र प्रधान बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर राज्याचे  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार विलासबापू खरात, रामेश्वर भांदरगे, सिद्धीविनायक मुळे, किरण खरात, रविंद्र अग्रवाल, रविंद्र राऊत, सतीष जाधव, चंपालाल भगत, किशोर अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
            केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री प्रधान म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शासनाने गत तीन वर्षात राबविलेल्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजामध्ये एक नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे . समाजातील गोरगरीब व्यक्तींचा विकास करण्याबरोबरच मेक ईन इंडिया, स्कील इंडिया, मुद्रा योजनेच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राचा विकास करत बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  देशाच्या सुरक्षेसाठी जवान आपल्या प्राणांची बाजी लावुन लढत असतात.  या सैनिकांसाठी  केंद्र शासनाने वनरॅक पेन्श्न योजना लागु करण्याचा निर्णय घेतला.  त्याचबरोबर देशातील काळापैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी सारखा धाडसी निर्णय घेतला असल्याचे सांगत संपूर्ण देशासाठी येत्या 1 जुलैपासून जीएसटी कर प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री प्रधान यांनी यावेळी सांगितले.
            भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी विभागाचा फार मोठा वाटा असल्याचे सांगत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेकविध योजना सुरु केलेल्या आहेत.   शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पादन वाढून त्यांचा आर्थिक स्तर उंचावा यासाठी शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.  तसेच पीकविमा योजना, कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही केंद्रीय मंत्री             श्री प्रधान यांनी यावेळी सांगितले.
            पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गोरगरीब जनतेला या जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाने गत तीन वर्षात जनहिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.   उज्वला गॅस योजनेंतर्गत देशातील 3 कोटी 60 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला असुन जालना जिल्ह्यात या योजनेंतर्गत 16 हजार कुटुंबाना गॅस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 
             देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे सांगत स्वच्छता अभियानात महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारतामध्ये प्रथम क्रमांकावर असुन राज्यातील 16 हजार 500 ग्रामपंचायती, 155 तालुके व 11 जिल्हे हागणदारी मुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील जाफ्राबाद, मंठा व परतूर हे तालुके हागणदारीमुक्त झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांना रसायन तंत्रज्ञानाबाबत शिक्षण घेता यावे यासाठी जिल्ह्यातील सिरसवाडी येथील गट नं. 132 मधील 200 एकरवर शासनाच्या अधिपत्याखाली अभिमत
विद्यापीठाचा दर्जा असणाऱ्या रसायन तंत्रज्ञान महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.  त्याचबरोबरच जालना येथे सीडस पार्कचीही उभारणी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यासह जालना जिल्ह्याचा विकास झपाट्याने करण्यात येत आहे.  जालना  शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी 150 कोटी रुपये, शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन शहरामध्ये 40 कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरु करण्यात आलेली आहेत.  शहरालगत ड्रायपोर्ट प्रकल्प साकारला जात असुन या माध्यमातुन उद्योग क्षेत्राचा विकास होण्याबरोबरच  रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांचीही समयोचित भाषणे झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती भास्कर दानवे यांनी केले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment