Thursday 5 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजना

 

जालना,दि. 5 (जिमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 च्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांना, उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या  तसेच परवाने घ्यावे लागत असतात. तरी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांकडून या परवानग्या व परवाने तात्काळ प्राप्त होण्याकरिता एक खिडकी योजना कार्यान्वीत करण्याबाबतचे  आदेश जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी जारी केले आहेत.

एक खिडकी योजना कार्यान्वित करुन त्यासाठी पथक गठीत केले आहे यात जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष अनर्थे, पोलिस अधिक्षक कार्यालयातील सहायक पोलिस निरीक्षक चैनसिंग सांडुसिंग गुसिंगे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अतिरिक्त पोलिस निरीक्षक अच्युत भातीलोंढे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन जीवन ठोसर, महसुल सहायक अनिरुध्द जुंबड आणि महसुल सहायक सचिन पगारे यांची नियुक्ती एक खिडकी योजनेत करण्यात आली आहे.

उमेदवारांना चौकशी व सर्व प्रकारच्या जाहीर सभा, पोस्टर/झेंडे बॅनर्स, खाजगी जाहिरात फलक, केवळ उमेदवारांच्या मतदार संघाच्या कार्यक्षेत्रापर्यंत प्रचार वाहन परवानगी, प्रचार कार्यालयाची परवानगी, हेलीपॅडवर हेलीकॉप्टर उतरविणे, ध्वनीक्षेपाची परवानगी, मिरवणूक/रोडशो/रॅलीज आणि सोशल मीडिया/केबल/वृत्तपत्रिय जाहिरातीची परवानगी येथून मिळणार आहेत. उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना सक्षम अधिकाऱ्यांडून आवश्यक त्या परवानग्या आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर दिल्या जाणार आहेत. उमेदवारांना दिलेल्या परवानगीची त्या-त्या कार्यालयस्तरावर नोंदवहीमध्ये नोंद ठेवावी. तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीस अधिन राहून सर्व संबंधितांना परवाने देण्याची दक्षता घ्यावी. असेही आदेशात नमुद केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment