Friday 13 January 2023

दैनंदिन आहारामध्ये तृणधान्याचा समावेश अत्यंत गरजेचा -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे

 


 

जालना, दि. 13 (जिमाका) :- भारतीयांचे प्रमुख अन्न म्हणून तृणधान्य ओळखले जात होते. मात्र काही वर्षांपासून त्यात घट होत आहे. आपण आपले धान्य विसरून पाश्चात्त्य धान्याच्या मागे लागलो आणि विविध व्याधींना बळी पडलो. या व्याधींपासून मुक्तता हवी असेल तर तृणधान्याशिवाय पर्याय नाही, हे सत्य आहे. हे सत्य जगाने ओळखले म्हणून जगातील विविध देशांमध्ये तृणधान्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. तृणधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेवून दैनंदिन आहारामध्ये तृणधान्याचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले.

कृषि विभगाच्यावतीने जिल्ह्यात वर्ष 2023 हे पौष्टिक तृण धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या अनुषंगाने  जालना तालुक्यातील सिरसवाडी येथे कृषि विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी, तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे, कृषी विज्ञान केंद्राच्या आहार विशेषज्ञ संगीता कऱ्हाळे, तंत्र अधिकारी प्रियांका जगताप, राजेंद्र गावित यांची उपस्थिती होती 

श्री. रणदिवे म्हणाले की, भारतासह जगात तृणधान्याच्या लागवडीखालील क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. तृण धान्याचा वापर दैनंदिन जीवनात व्हावा या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. तृण धान्याचे लाभ जनसामान्यांच्या मनावर विविध स्तरांतून बिंबवणे आवश्यक आहे. भारतीय कृषी संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या ‘तृणधान्या’ला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष जागतिक धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघात यासंबंधीचा ठराव मांडला होता. सध्या ‘फास्ट फूड’चा जमाना असल्याने तृणधान्याला महत्त्व दिले जात नाही. तृणधान्यात भात,ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोद्रो, कुटकी, सावा, राळा, वरई (भगर), नाचणी या पिकांचा समावेश होतो. मुख्य अन्नाच्या तुलनेत जास्त फायबर देणारे हे अन्न आहे. या धान्याच्या पिकांची वाढ ही कोरडवाहू जमिनीसह पर्जन्यवृष्टी असलेल्या परिस्थितीतही होते, हलक्या जमिनीतही तृणधान्यचे पीक घेता येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 कृषि विज्ञान केंद्राच्या संगीता कऱ्हाळे यांनी तृणधान्यचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले तर  प्रियांका जगताप यांनी तृणधान्याचे महत्व विशद केले. यावेळी श्रीमती दाभाडे यांनी कृषी प्रक्रिया उद्योगावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी सतीश कमाने, कृषि सहायक काकडे यांच्यासह रावसाहेब ढगे, संगपाल वाहुळकर, सरपंच सुमित्राताई ढगे, सदस्य कविता वाहुळकर, उपसरपंच यमुनाबाई खळेकर ,कलिंदा ढगे पोलीस पाटील, अर्जुन ढगे यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment