Tuesday 15 March 2022

ग्राहक संरक्षण कायद्याने दिलेल्या किमान सहा हक्कांची ग्राहकांना माहिती असणे आवश्यक -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम संपन्न

 



            जालना, दि. 15 (जिमाका):- ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्यात येते. बाजारामध्ये कुठलीही वस्तु खरेदी करत असताना ग्राहकाने जागरुक राहणे गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण कायद्याने दिलेल्या किमान सहा हक्कांची माहिती ग्राहकाला असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

            जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसय्यै, मोहन इंगळे, ॲड महेश धन्नावत, कु. संतोषी देशमुख, विनोद पाटील, शंकरअप्पा सवादे, डॉ.दिलीप लाड, संजय देशपांडे, शालिनी पुराणिक, रुचिता सेवलीकर आदींची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, ग्राहक संरक्षण कायद्याने दिलेल्या अधिकारापैकी किमान सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा हक्क, म्हणणं मांडण्याचा हक्क, तक्रार करण्याचा हक्क  आणि ग्राहकांच्या हक्काविषयी शिक्षण या सहा हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. सुरक्षित वस्तू खरेदी हा ग्राहकाचा हक्क आहे. आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूंच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी ही उत्पादकाची असते. विक्रेत्याने नेहमी उच्च गुणवत्ता असलेल्या वस्तूंची विक्री करावी. काही तक्रार जाणवत असल्यास कंपनीकडे तक्रार करावी.  ग्राहकाला कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाची निवड कारण्याचा हक्क आहे. बाजारात गेल्यानंतर जर विक्रेता तुम्हाला एकाच ब्रँडची वस्तू घेण्याचा आग्रह करत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात तक्रार करू शकता. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला उत्पादनाशी निगडीत उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, किंमत, शुध्दता, एक्स्पायरी डेट या सर्वांबाबत माहिती मिळण्याचा हक्क असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 ग्राहकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ग्राहकाने विकत घेतलेल्या वस्तूमध्ये काही बिघाड झाला असल्यास किंवा वस्तू खराब असल्यास त्याच्या विरोधात मत मांडण्याचा हक्क ग्राहकाला आहे. जर ग्राहकाला आपली फसवणूक झाली असे जाणवत असेल तर त्या व्यवसायिक किंवा कंपनीची तक्रार ग्राहक मंचात करता येते. फसवणूक झाल्यास उत्पादन असो, व्यवसायिक असो किंवा कंपनी विषयी तक्रार असो ग्राहक याबाबत कायद्यांतर्गत तक्रार करू शकतो. ग्राहक मंच किंवा ग्राहक तक्रार निवारण केंद्राला त्या तक्रारीचे निराकरण करावे लागते. ग्राहकाला आपल्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी सांगितले.

मोहन इंगळे म्हणाले, ग्राहकांनी कुठलीही वस्तु खरेदी करताना पक्के बील घ्यावे. वस्तुंवर छापील किमंतीपेक्षा कमी किमंतीमध्ये वस्तु घेण्याचा अधिकारही ग्राहकाला आहे. तर ॲड महेश धन्नावत म्हणाले, आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ग्राहकाने ऑनलाईन व्यवहार घेताना काळजी घ्यावी.  मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक कोणालाही न देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी कु. संतोषी देशमुख यांनी डिजिटल बँकींग व्यवहार व त्यामाध्यमातुन मिळणाऱ्या सुविधा तसेच ऑनलाईन व्यवहारामध्ये होणारी फसवणुक याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्यै यांनी जागतिक ग्राहक दिन आयोजनामागी भूमिका विषद केली.

कार्यक्रमास ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment