Thursday 26 September 2019

निवडणुकीदरम्यान बँकेतुन होणाऱ्या व्यवहारावर करडी नजर ठेवा - उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे



            जालना, दि.26 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या निवडणुकी दरम्यान बँकेतील होणाऱ्या व्यवहारावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे यांनी दिले.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने सर्व बँकर्सच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती मोतियाळे बोलत होत्या.
            यावेळी लेखा  व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, लिड बँकचे व्यवस्थापक श्री ईलमकर, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्यासह सर्व बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
            उपजिल्हाधिकारी श्रीमती मोतियाळे म्हणाल्या, निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यातुन रोख रक्कम काढण्याल्या संशयास्पद व्यवहाराची माहिती निवडणूक विभागाला तातडीने देण्यात यावी.   मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पैसे जमा करण्याच्या किंवा काढण्याच्या अशा कोणत्याही प्रसंगाशिवाय निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँक खात्यातुन एक लाखापेक्षा अधिक रक्कम संशयास्पदरितीने बँक खात्यातुन काढली असल्यास अथवा जमा केली असल्यास त्याबाबतही माहिती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या उमेदवारांच्या शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांच्य किंवा तिच्या पतीच्या, त्याच्या पत्नीच्या किंवा त्यांच्या अवलंबितांच्या बँक खात्यातुन एक लाखापेक्षा अधिक रक्कम जमा करणे अथवा काढणे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्षाच्या खात्यातुन एक लाखापेक्षा अधिक रक्कम काढणे तसेच मतदारांना लाचलुचपत देण्यासाठी जी वापरली जाऊ शकते अशा रोख रक्कमेचे कोणतेही संशयित व्यवहार रोखण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याबरोबरच याबाबतची माहिती निवडणूक विभागास तातडीने सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख काढल्याचे कोणतेही संशयास्पद प्रकरण निदर्शनास आल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सुचना देत निवडणुकीसाठी जे उमेदवार बँकेत खाते उघडतील त्यांना तातडीने धनादेश उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही श्रीमती मोतियाळे यांनी यावेळी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
            यावेळी लेखा  व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने बँक अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना केल्या.
*******


No comments:

Post a Comment