Saturday 31 August 2019

रेशीम धाग्यापासुन कापड निर्मितीचा उद्योग जालन्यामध्ये आणणार - राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर


रेशीम धाग्यापासुन कापड निर्मितीचा उद्योग जालन्यामध्ये आणणार
                                      - राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर
            जालना, दि. 31 –  शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग शेतकऱ्यांना फलदायी ठरत आहे.  राज्यात सर्वाधिक रेशीम शेती जालना जिल्ह्यामध्ये करण्यात येत असुन येणाऱ्या काळात रेशीम धाग्यापासुन कापड निर्मिताचा उद्योग जालन्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.
            येथील जुनामोंढा परिसरात भव्य अशा प्रदर्शनाचे उदघाटन तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना श्री खोतकर बोलत होते.
            व्यासपीठावर गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, आदित्य ठाकरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, खासदार हेमंत पाटील, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, लक्ष्मण वडले, विनोद घोसाळकर, पांडूरंग डोंगरे, संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त              डॉ. माधवी खोडे, रेशीम संचालनालयाच्या संचालक श्रीमती भाग्यश्री बानायात, जिल्हा रेशीम विकास अधिकारी  श्री मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले, चीन  देशामध्ये 82 टक्के एवढे रेशीमचे उत्पादन होत असुन केवळ 16 टक्के उत्पादन भारत देशामध्ये होते.  संपुर्ण जगामध्ये रेशीमपासुन उत्पादित केलेल्या मालाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  रेशीम उद्योगाला चालना देण्याचे काम रेशीम विभागामार्फत करण्यात आले असल्याचे सांगत संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रेशीमचे उत्पादन जालना जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे.  मनरेगाच्या माध्यमातुनही रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित केले जात असुन या माध्यमातुन राज्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यात येत आहे.  येणाऱ्या काळात रेशीम धाग्यापासुन कापड निर्मितीचा उद्योग जालन्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जालना जिल्हा हा अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणुन ओळखला जातो.  शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच जोडधंदा करुन त्या माध्यमातुन आपला आर्थिक स्तर उंचावण्याची गरज असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम उद्योगाकडे वळण्याची गरज असल्याचेही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी आदित्य ठाकरे यांचेही समयोचित भाषण झाले.
            याप्रसंगी रेशीम, कृषी उद्योग, रेशीम धाग्यापासुन निर्मित विविध प्रकारचे वस्त्र,कृषि विभाग, वन विभाग, महिला बचतगटांच्या उत्पादनांचा समावेश असलेल्या भव्य अशा प्रदर्शनाचे उदघाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, महिला व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




No comments:

Post a Comment