Monday 26 August 2019

कांदळवनातील ८ हजार टन कचऱ्याचे संकलन ११ कि.मी. चा समुद्र, खाडी किनारा झाला स्वच्छ ! - सुधीर मुनगंटीवार


मुंबई, दि. २५ : कांदळवन क्षेत्रात  २५ हजार लोकांच्या सहभागातून ८ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आल्याने ११.०३ कि.मी. चा समुद्र आणि खाडी किनारा स्वच्छ झाला आहे. शहरी वनक्षेत्र स्वच्छतेचे भारतातील सर्वात मोठे अभियान लोकसहभागातून यशस्वी झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
या अभियानाला लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. कांदळवन क्षेत्र हे समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जैवविविधतेचे भंडार समजले जाते. मत्स्यबीज तयार होण्याचा हा उगमस्त्रोत आहे. त्याचबरोबर सुनामी आणि चक्रीवादळापासून समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील लोकांचे संरक्षण करण्यामध्ये हे क्षेत्र महत्वाची भूमिका बजावते. कांदळवनात सागरी जीवांचे चिरकाळ संवर्धन होते. कांदळवनाची कर्बाम्ल शोषून घेण्याची क्षमता मोठी असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये या वनांचे  मोठे योगदान असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई हे जगातील मोठे कांदळवनक्षेत्र असणारे शहर आहे. प्लास्टिकपासून कांदळवनाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी वन विभागाने हे स्वच्छता अभियान हाती घेतले होते. याची सुरुवात मार्च २०१५ मध्ये सुरु झाली. या अभियानांतर्गत मुंबईनवी मुंबईबांद्रावर्सोवादहिसरशिवडीऐरोलीभांडूपगोराईवाशी येथील कांदळवनाची स्वच्छता करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र कांदळवन कक्षाची निर्मिती केली आहे. या कक्षामार्फत सागरतटीय क्षेत्रातील या वनांच्या संवर्धन आणि संरक्षणाबरोबर कांदळवन उपजीविका योजनाही राबविली जाते. या अभियानात शिंपलेमासेकालवे पालनखेकड्यांची शेती अशा विविध पद्धतीने उपजीविकेची साधने विकसित करण्यात येत आहेत.  महिला बचतगटांना यात सहभागी करून घेतले जात आहे. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्यातील कांदळवन क्षेत्रात ८२चौ.कि.मी ची वाढ झाली असून देशात महाराष्ट्र यात अग्रस्थानी असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment