Thursday 8 August 2019

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 100 टक्के पुर्ण करा -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे




            जालना, दि. 8 – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली असुन  जालना जिल्ह्याला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट १०० टक्के पुर्ण होईल, याची दक्षता सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
            33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना चौधरी, उपवन संरक्षक एस.पी. वडसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती पुष्पा पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की, जालना जिल्ह्याला वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत एक कोटी 50 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवड ही समाजातील प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असुन अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड कार्यक्रमाकडे केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून न पाहता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिकाधिक वृक्षांची लागवड करावी.   शासकीय कार्यालयांच्या परिसरात, शाळा, महाविद्यालय तसेच रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करता येऊ शकते.  सध्या वृक्ष लागवडीसाठी वातावरण पोषक असुन अधिकाऱ्यांनी उद्दिष्टापेक्षा अधिकची  वृक्ष लागवड करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी प्रत्येक शासकीय विभागनिहाय वृक्ष लागवडीच्या कामाचा आढावा घेतला.

No comments:

Post a Comment