Wednesday 14 August 2019

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न



            जालना, दि. 15 – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.      यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार राजेश टोपे, उपाध्यक्ष सतीष टोपे, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उप विभागीय अधिकारी केशव नेटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जनतेला उद्देशुन संदेश देताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  15 ऑगस्ट रोजी देश स्वतंत्र झाला.  काश्मीरदेखील स्वतंत्र होता. परंतू कलम 370 आणि 35 (अ) मुळे त्याला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला होता.  370 कलम रद्द झाल्याने काश्मीरची स्वायतत्ता नष्ट होऊन तो आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिन साजरा करताना काश्मीरी जनता खऱ्या अर्थाने भारतीय झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगत हा निर्णय घेतल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभारही व्यक्त केले. 
      महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.  याप्रसंगी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक सुधारणेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह आपल्या राज्याला विविध समाजसुधारकांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे.  त्या सर्वांचे प्रेरक स्मरण करणे आणि त्या आदर्शांसोबत उज्वल वाटचाल करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.  सांस्कृतिक, वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा विविधांगी क्षेत्रात महाराष्ट्रातील विभूतींनी उल्लेखनीय योगदान दिलेले आहे.  हा प्रगतीचा वारसा भविष्यात अधिक समृद्ध व्हावा यादृष्टीने आपण सर्व कृतीशील राहू या आणि आपल्या महाराष्ट्राच्या लौकिकात भर टाकणारी वाटचाल एकमेकांच्या साथीने करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर यांनी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******







No comments:

Post a Comment