Tuesday 23 August 2022

सोयाबीन व कापूस पिकांच्या योग्य वाढीसाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी…!

 


 






     जालना जिल्हयात अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांची लागवड केलेली आहे.  या पिकांवर पडणाऱ्या रोगांचा समूळ नायनाट करुन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कापूस पिकांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासू नये तसेच गुलाबीअळीचे नियंत्रणही करणे आवश्यक आहे.  सोयाबीनची पिके अन्नद्रव्यामुळे गळून जाऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत कृषि विभागामार्फत मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.  सोयाबीन व कापूस पिकांच्या योग्य वाढीसाठी शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी,

            सततच्या पावसामुळे कापूस पिकांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे पिकामध्ये पिवळसरपणा दिसत आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी कापूस पिकास जमिनीतून नत्राची मात्रा द्यावी. सोबत फवारणीद्वारे 0.5 टक्के(10 लिटर पाण्यात 50 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट व 50मिली सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-II एकत्र करून फवारणी करावी.  कापूस  आणि सोयाबीन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर करावा.

             सोयाबीन पिक हे सध्या फुलोरा व शेंगा  लागण्याच्या अवस्थेत आहे. हा फुलोरा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे गळून जावू नये व येणारी शेंग पूर्णपणे योग्य भरण्यासाठी 12:61:0 (100 ग्राम) व 50मिली सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड II 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करा

            जालना जिल्ह्यात काही भागात वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. जेणेकरून पुढे बोंडे लागल्यानंतर होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल.

            कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी 05 या प्रमाणात लावावीत़. मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे 8 ते 10 कामगंध सापळे लावावेत.

ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी 2-3 या प्रमाणात पीक 60 दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे. 5 टक्के निंबोळी अर्क अथवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशी युक्त कीटकनाशकाची 800 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस 8 ते 10 पतंग प्रति सापळा किंवा 1 अळी प्रति 10 फुले किंवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.

            प्रोफेनोफॉस 50 टक्के 400 मिली प्रती एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 88 ग्रॅम प्रती एकर किंवा प्रोफेनोफोस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) 400 मिली प्रती एकर आलटून पालटून फवारावे.

            किटकनाशकासोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

                                                                                              --  जिल्हा माहिती कार्यालय,

                                                                                                           जालना

***

No comments:

Post a Comment