Wednesday 22 November 2023

महारेशीम अभियान- 2024 तुती लागवडीकरीता नोंदणीस प्रारंभ प्रचार वाहनास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविला हिरवा झेंडा शेतक-यांना मिळणार प्रति एकर रुपये 3.97 लाख रुपये अनुदान नवीन तुती लागवडीकरीता नोंदणी करण्याचे आवाहन

 



जालना, दि. 22 (जिमाका) - महारेशीम अभियान-2024 अंतर्गत नवीन तुती लागवड नोंदणी करण्यासाठी गावो-गावी जाणाऱ्या प्रचार वाहनास जिल्हाधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून महारेशीम अभियानाची जिल्ह्यात सुरूवात केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात २१ नोंव्हेबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी, (रो.ह.यो.) मनीषा दांडगे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक एस.आर. जगताप, क्षेत्र सहाय्यक व्ही.आर.कोल्हाळ, जी.के.गीते तसेच रेशीम उद्योजक गणेश शिंदे, वरूडी ता.बदनापुर, रेशीम उत्पादक शेतकरी भागवत येळेकर, आलमगाव राहुल काळे, लोणार भायगाव ता.अंबड आदींची उपस्थिती  होती. सदरचे महारेशीम  अभियान हे  २०  डिसेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

             जिल्हाधिकारी म्हणाले की,  रेशीम उद्योग शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देत असुन जालना येथे रेशीम कोषाची मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे रेशीम शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी वाहतुक खर्च करून दुरवर जावे लागत नाही, तसेच मनरेगा अंतर्गत रेशीम विकास योजनेचया अनुदानात वाढ झाली असुन त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे अवाहनही त्यांनी केले.

तत्पुर्वी जिल्हास्तरीय महारेशीम अभियान बैठकीमध्ये    रेशीम विभाग, मनरेगा, पंचायत समिती व कृषी या सर्व विभागांनी मिळुन जिल्ह्यात किमान ३००० नवीन शेतकऱ्यांची तुती लागवडीकरीता निवड करावी अशी सुचना  जिल्हाधिकारी यांनी केली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी गहनीनाथ कापसे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रो.ह.यो.,जि.प.) श्री. चव्हाण,   उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते  हे उपस्थित होते.    

             दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णया नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम विकास योजनेच्या प्रति एकर अनुदानामध्ये रूपये 3.58 लाख वरून रू. 3.97 लाख इतकी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मनरेगा अंतर्गत रेशीम विकास योजनेचे प्रस्तावांना  तांत्रिक मांन्यता देणे, प्रशासकिय मान्यता देणे, कार्यारंभ आदेश देवुन अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ देणेचे अधिकार आता रेशीम विकास अधिकारी यांचे सोबतच गट विकास अधिकारी,  पंचायत समिती  तसेच तालुका कृषी अधिकारी  यांनाही देण्यात आले आहे. मनरेगा अंतर्गत जे शेतकरी अनुदानास पात्र ठरत नाहीत अशा शेतकऱ्याना सिल्क समग्र-2 या योजनेतुन तुती लागवड, ठिबक सिंचन,  ‍किटक संगोपन गृह व किटक संगोपन साहित्य या बाबी करीता अनुदान देण्याची सूविधा निर्माण झाली आहे.त्यामुळे रेशीम उद्यांग करण्यासाठी कोणत्याही वर्गवारीतील शेतकरी आता अनुदानापासुन वंचित राहणार नाही. त्यामुळे दिनांक 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधुन नवीन तुती लागवडीकरीता नोंदणी करावी, असे अवाहन  रेशीम विकास अधिकारी  अजय मोहिते यांनी केले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment