Monday 4 November 2019

भोकरदन व अंबड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून पहाणी



            जालना दि.4-  जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपीकांची राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे संपुर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत.  आज दि. 4 ऑक्टोबर रोजी भोकरदन तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्ष शेतीला भेट देऊन पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
        पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले, जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन व मका या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. याशिवाय कापूस व इतर पिकांनाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण ६ लक्ष १५ हजार हेक्टरपैकी ४ लक्ष ३३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले असून जवळपास जल्ह्यातील ५ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे यात जवळपास ३२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने शासनास कळविलेले आहे. बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे. गेल्या पाच वर्षात राज्य शासनाने 50 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असल्याची माहिती देत शासन शेतकऱ्यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
      या पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, भाऊसाहेब भुजंग, रामलाल चव्हाण, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसिलदार मनिषा मेने यांच्यासह तालुका कृषि अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  
            पालकमंत्री श्री लोणीकर यांची सर्वप्रथम भोकरदन तालुक्यातील राजुर येथे दिगांबर पुंगळे, किसनराव टोम्पे या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेतातील मका व बाजरी या नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली.  तपोवन येथे बाबुराव मालुसरे, नारायण मालुसरे यांच्या शेतातील कापूस व सोयाबीन, मका पीकांची पहाणी केली. अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथे रामेश्वर जिगे, विमलबाई जिगे, रामदास जिगे यांच्या शेतीला भेट देत कापूस पिकाची पहाणी केली. शेवगा येथे रुक्मिणीबाई रांदवण, सुधाकर सराळे यांच्या शेतातील मका, कापूस पीकांची पहाणी केली.








No comments:

Post a Comment