Tuesday 24 December 2019

बँकांनी कर्जवाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पुर्ण करावे -- नरेंद्र पाटील



            जालना, दि. 24 –अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत समाजातील तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जाची प्रकरणे त्वरेने निकाली काढण्याबरोबरच बँकांना कर्जवाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट शंभर टक्के पुर्ण करण्याचे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.
            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना श्री पाटील बोलत होते.
            यावेळी आमदार संतोष दानवे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी निशांत ईलमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.  राज्य शासनाच्या मोठ्या प्रमाणात ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्यात येतात.  राष्ट्रीयकृत बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास योजनेंतर्गत तरुणांनी केलेल्या कर्जाच्या मागणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.  बँकांनी तरुणांची प्रकरणे विनाकारण नाकारु नयेत.  त्याचबरोबर सहाकारी बँकांनीही तरुंणाना कर्ज उपलब्ध करुन द्यावे.  ज्या बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेले नसेल अशा बँकांनीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवत अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजुर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            समाजातील तरुणांनीही नोकरीच्या मागे लागता नोकरी मागण्यापेक्षा उद्योग व्यवसायाच्या माध्यमातुन नोकरी देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करावी.  या महामंडळाच्या माध्यमातुन ज्या बँकांकडून उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे त्याची परतफेड विहित वेळेत करावी.  येणाऱ्या कालावधीमध्ये या योजनेसंदर्भात अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी तालुकास्तरावरही बैठकांचे, मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील प्रत्येक गरजु तरुणाला या महामंडळाच्या माध्यमातुन कर्जाची प्रकरणे मंजुर करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी आमदार संतोष दानवे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनीही उपस्थित बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत तरुणांना अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजुर करण्याचे निर्देश दिले.
            बैठकीस सर्व बँकांचे व्यवस्थापक, संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी तसेच समाजातील तरुणांची उपस्थिती होती.






No comments:

Post a Comment