Friday 3 January 2020

इंटरनेटचा वापर करताना महिलांनी काळजी घेण्याची गरज “सायबर सेफ वुमन” कार्यशाळेतील सुर



      जालना, दि. 3 -  आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. इंटरनेटच्या सहाय्याने आपल्या हवी असलेली माहिती, खरेदी, विक्रीसह ईतर आर्थिक व्यवहारही एका क्लिकच्या माध्यमातुन होत आहेत.  परंतू इंटरनेटचा वापर करताना आमिषाला बळी पडुन आपली फसवणुक तर होत नाही ना याची काळजी समाजातील प्रत्येक नागरिकांबरोबरच महिलांनीही घेण्याची गरज असल्याचा सुर सायबर सेफ वुमन कार्यशाळेत निघाला.
            जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावकसंघ, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेफ वुमन मोहिमेंतर्गत जैन विद्यालय जालना येथे महिला व बालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
            व्यासपीठावर सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲड प्रभाकर गवारे, सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती किर्ती पाटील, धरमचंद गादीया, सुदेशकुमार सकलेचा, माहिती सहाय्यक अमोल महाजन, दामिनी पथकाच्या प्रमुख श्रीमती पल्लवी जाधव, महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख श्रीमती राठोड,  संजयकुमार बंब, शांतीलाल संचेती, श्रीमती पुजा टेहरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले, आजघडीला विविध कंपन्या ग्राहकांना इंटरनेटच्या माध्यमातुन प्रलोभने दाखवुन त्यांना फसवण्याचे प्रकार करत आहेत.  अशा फसव्या जाहिरातीपासुन नेटीजन्सनी सावधान होणे गरजेचे आहे. एखाद्या संकेतस्थळावरुन वस्तु खरेदी करताना त्याची सत्यता पडताळुनच ती खरेदी केली पाहिजे. तरुणांकडून समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.  केवळ लाईक्स मिळण्यासाठी मुला-मुलींकडून त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर केले जातात.  समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या फोटो व व्हिडीओचा अनेकवेळा गैरवापर केल्याचे दिसुन येते.  याबाबत मुलींनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करत आपली वैयक्तिक माहिती समाजमाध्यमांवरुन प्रसारित न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
            विविध प्रलोभने दाखवत मोबाईलवर अनेकवेळा फसवे संदेश अथवा फोन करुन आपल्या बँकेच्या एटीएमचा पासवर्ड अथवा ओटीपी मागितला जातो.  अशावेळी हा पासवर्ड अथवा ओटीपी कोणालाही देऊ नये.  अशाप्रकारे अनेकवेळा फसगत झाल्याचे अनेक उदाहरणे आपल्यासमोर असल्याने इंटरनेटच्या अथवा मोबाईलच्या सहाय्याने आर्थिक व्यवहार करताना योग्य ती दक्षता घेण्याची गरज असल्याचेही श्री तांबे यांनी यावेळी सांगितले.
            उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर म्हणाले, सायबरच्या माध्यमातुन महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्यभर  सायबर सेफ वुमन  मोहिम राबवुन या माध्यमातुन महिलांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  सायबर गुन्हे हा आज एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर सायबर सेलची निर्मिती करण्यात आली असुन या सेलच्या माध्यमातुन घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच पिडितांना न्याय देण्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगत इंटरनेटच्या माध्यमातुन व्यवहार करताना तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना महिला व मुलींनी दक्षता घेण्याची गरज असल्याचेही श्री खिरडकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्य महिला आयोगाचे समन्वयक श्री गवारे म्हणाले, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये विशाखा समितीची स्थापना करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असेल या समितीच्या माध्यमातुन त्यांना दाद मागण्याची सुविधा असुन या समितीला न्यायालयाप्रमाणे अधिकार देण्यात आलेले आहेत.  या समितीसमोर अशा प्रकारचे एखादे प्रकरण आल्यास तीन महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याचे सांगत महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
            पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जाधव,  श्रीमती राठोड यांनी महिलांचे व बालकांचे अधिकार या विषयावर उपस्थितांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती किर्ती पाटील यांनी कार्यशाळा आयोगाजनामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संजय सोनवणे यांनी केले. या मोहिमेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ संदेशही उपस्थितांना दाखविण्यात आला.
            कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनी, शालेय शिक्षक, शिक्षिका, महिला व पत्रकारांसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.









No comments:

Post a Comment