Saturday 25 January 2020


आरोग्य विभाग अधिक सक्षम करणार
                                      - पालकमंत्री राजेश टोपे
            जालना, दि. 26 – सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिकाधिक चांगल्या प्रमाणात पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
            भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी जनतेला उद्देशुन संदेश देताना ते बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नाराण कुचे, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा,निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसय्यै, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, तहसिलदार संतोष बनकर, प्रशांत पडघन, श्री. भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले रुग्णांना आरोग्याच्या चांगल्या व दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात  आरोग्य विभाग सक्षम करुन रुग्णांना अधिक कार्यक्षमतेने आरोग्य सेवा देण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे सांगत बदलत्या जीवनशैलीमुळे मेंदुचे आजार वाढले आहेत. मेंदुच्या आजाराची तपासणी व निदान करण्यासाठी सी.टी. स्कॅन मशिन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते.  परंतू आता जिल्हा रुग्णालयात सी.टी. स्कॅन मशिन उपलब्ध झाली असुन ही सेवा सुरु झाली असुन  एमआरआय मशिन मंजुर करुन या सेवेचा लाभही थोड्याच दिवसात रुग्णांना मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            मराठवाडा विभागासाठी आजपर्यंत मनोरुग्णांच्या उपचारासाठी मनोरुग्णालय नव्हते.  जालना येथे या मनोरुग्णालयाच्या उभारणीसाठी शासनाने मंजुरी दिली असुन येत्या महिन्याभरात या मनोरुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.  आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्या-टप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात असल्याचे सांगत आरोग्य विभागास औषधी व लसींची साठवणुक करण्यासाठी स्वतंत्र ईमारत नव्हती.  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १ कोटी 50 लक्ष रुपये खर्चुन जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात या ईमारतीची उभारणी करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
            निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नापिकीचा सामना करावा लागल्याने शेतीसाठी घेण्यात आलेले पीककर्ज फेडण्यासाठी शेतकरी राजा असमर्थ ठरला. या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असुन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ची घोषणा शासनाने केली आहे. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्याकडील उचल केलेले एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्प मुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत मुद्दल व व्याजासह असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.  तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्यावरील रक्कम भरुन घेऊन या योजनेचा लाभ देण्यासाठी लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे.   जे शेतकरी त्यांच्याकडील कर्जाच्या रक्कमेची प्रामाणिकपणे परतफेड करत आहेत. अशांसाठीसुद्धा ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याच्यासंदर्भात शासन विचाराधिन असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले.
            शेतीच्या मशागतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज मिळावे अशी अपेक्षा असते.  जालना जिल्ह्यासाठी रब्बी व खरीप पीक वाटपासाठी एक हजार 500 कोटी रुपये लक्षांक ठरविण्यात आला आहे.  जिल्ह्यातील प्रत्येक गरजु शेतकऱ्याला पीककर्ज देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आढावा घ्यावा व पीककर्जापासुन एकही गरजू शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केली. 
            शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत असुन या योजनेमध्ये 350 पेक्षा अधिक गावांची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली अशी ही योजना असुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत कृषि विभागाने ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी केली.
           
            आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असुन विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिक मजबुत होत आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांच्या स्वप्नाची पूर्तता करणाऱ्या 73 74 व्या घटना दुरुस्त्या लक्षात घेता या वर्षामध्ये व त्यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतुन सहभाग घ्यावा.  तसेच स्वत:बरोबर इतर सहकाऱ्यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले.  परेडमध्ये पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँडपथक, महिला सुरक्षा दामिनी पथक, दंगल नियंत्रण पथक, अग्निशामक दलासह विविध विभागाच्या चित्ररथांचा समावेश होता.
            यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थीनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
            कार्यक्रमाचे संचलन निशिकांत मिरकले यांनी केले.  कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, पत्रकार,विद्यार्थी, विद्यार्थीनीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.









No comments:

Post a Comment