Saturday 25 January 2020

शिवभोजन योजनेचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ




            जालना, दि. 26 – समाजातील गरजु व गरीब व्यक्तींना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करुन देणाऱ्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात  करण्यात आला.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, उपाध्यक्ष महेंद्र पवार, मनोज मरकड, रघुनाथ तौर, निवार देशमुख, बबलु चौधरी, रामधन कळंबे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा,निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसय्यै, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.                        
            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल. जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा रुगणालय तसेच महिला रुग्णालयाच्या परिसरात हे शिवभोजन प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे. राज्य शासन या योजनेसाठी प्रत्येक जेवणाच्या ताटा मागे अर्थात प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये रुपये 50 तर ग्रामीण भागामध्ये रुपये 35 असे दर कंत्राटदारांना देणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकांकडून केवळ 10 रुपये रक्कम घेतली जात असली तरी सदर थाळीची किंमत ही शहरी भागांमध्ये 50 रुपये व ग्रामीण भागामध्ये          35 रुपये असणार आहे. दहा रुपये वगळता अन्य रक्कम ही अनुदान असणार आहे. जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच या भोजनालयातून शिवभोजन थाळी मिळणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक गरजु व गरीब व्यक्तीला चांगली सेवा देण्यात यावी.  या ठिकाणी देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा उत्तम ठेवण्याबरोबरच या ठिकाणी स्वच्छता राहील याची दक्षता घेण्याची सुचना करत  या योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment