Tuesday 12 December 2023

महारेशीम अभियान अंतर्गत रेशीम शेतकरी चर्चासत्र संपन्न शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आर्थिक प्रगती करावी -- विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड

 




जालना, दि. 12 (जिमाका) : -तर पिकांचे उत्पादन मिळविण्यासाठी  शेतकऱ्यांना किमान सहा महिने वाट पाहावी लागते, मात्र रेशीम उद्योगामध्ये केवळ 21 दिवसांत शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळविता येते. तसेच नैसर्गिक आपत्तीचा विपरित परीणाम या पिकावर जास्त प्रमाणात होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आपला आर्थिक  विकास साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी केले.

सॉईल टु सिल्क चॉकी केंद्र, कचरेवाडी ता.जालना येथे महारेशीम अभियान अंतर्गत दि. 8 डिसेंबर रोजी  शेतकरी चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी श्री. आर्दड  बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ  म्हणाले की, जालना जिल्हा रेशीम उद्योगातील सर्व प्रक्रीयांमध्ये अग्रेसर आहे. आता तुती लागवड क्षेत्रातही आपला जिल्हा महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थानी येण्याकरीता सर्व यंत्रणांनी काम करावे. शेतकऱ्यांसाठी बदलणाऱ्या वातावरणामध्ये रेशीम शेती वरदान ठरत आहे. रेशीम उद्योगाकरीता मनरेगा मधुन रूपये 3.97/- लाख अनुदान देण्यात येते. याशिवाय रेशीम कोषांचा दर रूपये 300/- पेक्षा कमी दराने गेल्यास शासनाकडून प्रति किलो रुपये 50/- अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कचरेवाडी येथील चॉकी किटक संगोपन केंद्रामधुन उत्कृष्ट वाढ झालेले रेशीम किटक पुरवठा करण्याची सुविधा तसेच राज्यातील सर्वात मोठी रेशीम कोष बाजारपेठ जालना येथे आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानामध्ये नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते म्हणाल की, महारेशीम अभियान अंतर्गत नोंदणी करावयाची  अंतिम तारीख 20 डिसेंबर असल्याने तत्पुर्वीच शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवडी करीता नोंदणी करावी.

गेले 15 वर्षांपासून रेशीम शेती करणारे कचरेवाडी येथील रेशीम शेतकरी राजु कचरे, यांनी रेशीम  शेती आपणास फायदेशीर ठरली असुन यामधील उत्पादनापासुन आपण मुलांना चांगल्या शाळेत  शिकवत आहोत, छत्रपती संभाजीनगर येथे सदनिका व गावामध्ये रूपये 40 लाख खर्च करून चांगले घर बांधकाम करू शकलो. कचरेवाडी गावामध्ये आता 48 शेतकरी रेशीम शेती करत आहेत. रेशीम शेती मुळे माझी प्रगती झाली, आपणही रेशीम शेती करून आपली आर्थिक प्रगती करावी’, असे प्रतिपादन केले.

रेशीम शेतीपासुन भरघोस उत्पादन मिळविणारे कचरेवाडी येथील शेतकरी हरीभाउ ठोकळ यांनी सांगितले की, रेशीम उदयोगापासुन त्यांना हमखास उत्पन्न मिळत आहे. त्यांनी सुरूवातीस एक एकर तुती लागवड केली होती. त्यामधील उत्पन्न पाहुन त्यांनी आता 3.50 एकर तुती लागवड क्षेत्र वाढविले. रेशीम किटक संगोपन करताना काही कारणास्तव शेतकऱ्याची एखादी बॅच बाद झाल्यास त्याचे पूर्ण हंगामाचे नुकसान होत नाही, त्याला दोन महिन्यांनी पुन्हा पुढच्या बॅचमध्ये यश मिळविता येते, त्यामुळे रेशीम उद्योग शेतकऱ्यांना सुरक्षित पर्याय व संरक्षित पीक आहे.’  असे मत त्यांनी व्यक्त केले.

 कार्यक्रमापुर्वी मान्यवरांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे व अत्याधुनिक प्रति महा 1.00 लाख अंडीपुंज चॉकीची क्षमता असलेले सॉईल टु सिल्कया शेतकरी उत्पादक कंपनीचे विजय पाटील यांचे चॉकी किटक संगोपन केंद्राची पाहणी केली.

कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,  श्री. जी.आर.कापसे, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तालुका कृषी अधिकारी श्री.राठोड, गट विकास अधिकारी संदीप पवार, कचरेवाडीचे सरपंच प्रविण ससाणे, ग्रामपंचाय सदस्य गणेश मैंद, त्रिंबक कचरे,  सॉईल टु सिल्क चॉकी केंद्राचे मंगेश पाटील, निशांत पाटील, शिंदे सिल्क इंडस्ट्रीजचे  गणेश अरूणराव शिंदे,रेशीम विभागाचे वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक श्री.एस.आर.जगताप, श्री.एस.यु.गणाचार्य, श्री. व्ही.आर.कोऱ्हाळ, मनरेगा तांत्रिक सहाय्यक.गौरव काळे, ग्रामरोजगार सेवक लहु जाधव व शेतकरी उपस्थित  होते. कार्यक्रमा दरम्यान 30 नवीन शेतकऱ्यांनी नोंदणी केली.   

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment