Thursday 28 December 2023

पोस्टाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 5 जानेवारीला डाक अदालतीचे आयोजन

 


जालना, दि. 28 (जिमाका) :- भारतीय पोस्ट खात्यामध्ये सेवा देताना संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारीचा योग्य प्रकारे न्याय निवाड़ा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. तरी अशा तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी दि. 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील प्रवर अधिक्षक डाकघर या कार्यालयामधे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील पोस्टल सेवा ही सामाजिक आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अपरोक्षपणे डाकघराच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. डाक अदालतीमध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.

छत्रपती संभाजीनगर डाक विभागाअंतर्गत संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु / मनी ऑर्डर/ बचत बैंक खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.  संबधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार, प्रवर अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, - 431001 या नावे दोन प्रतीसह दि. 1 जानेवारी 2024 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment