Saturday 16 July 2016

जीवनावश्यक वस्तु व डाळींची साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना,

दि. 16 - जिल्हयातील डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांनी डाळी तसेच जिवनावश्यक वस्तुंचा साठा आणि विक्री करताना त्यामध्ये पारदर्शकता ठेवावी. जिवनावश्यक वस्तु विशेषत: डाळींची साठेबाजी आणि जादा भावाने विक्री करणाऱ्यांवर जिवनावश्यक वस्तु अधिनियमाअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी  केल्या.
          जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, प्रतिबंध व  जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाळींचे आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते. या बैठकीस सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एन. भारस्कर, नायब तहसिलदार गणेश पोलास  यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, जिल्हयामध्ये जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, प्रतिबंध व  जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पुरवठा विभागामार्फत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. या वस्तुंची साठेबाजी तसेच जादा दराने विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिवनावश्यक वस्तुंबाबत तक्रारी आल्यास संबंधितांवर धाडी टाकून त्यांच्यावर अधिनियमाअंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या सूचना  देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी       श्री जोंधळे यांनी यावेळी दिली. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत डाळींचा रास्त भावाने पुरवठा करण्यात येणार असल्याने डाळीची आवक, साठा, विक्री याबाबतच्या नोंदी संबंधित व्यापाऱ्यांनी  पारदर्शक आणि अद्यावत ठेवावेत.  ज्या व्यापाऱ्यांचे परवाने नुतनीकरण झालेले नाही अशांनी ते तातडीने करुन घ्यावेत.  तसेच प्रत्येक तहसिल कार्यालयात प्रलंबित असलेले परवाने तातडीने निर्गमित करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            या बैठकीस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीष पंच, दालमिल असोशिएशने अध्यक्ष अनिल पंच, अनिल सोनी, सुरेश भाकड, जालन्याचे नायब तहसिलदार एन.वाय. दांडगे, बदनापुरचे श्रीमती पापुलवाड, घनसावंगीचे श्री मिराशे, जाफ्राबादचे श्री राजपुत, जिल्हा पुरवठा कार्यालयातील बालाजी जामगे, एस.एस. काळे, एस.एम. पगार यांच्यासह  जिल्ह्यातील आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी आदी उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment