Thursday 28 July 2016

तंबाखु सेवनापासून तरुणांनी दूर रहावे - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन

जालना – तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर मोठे घातक परिणाम होत असून तरुण पिढीमध्ये हे व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. या पदार्थांच्या व्यसनापासून तरुणांनी दूर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
            राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगरेट व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 व  27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान आयोजित कर्करोग दिनाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले की,   तंबाखुच्या व्यसनामुळे कर्करोगासारख्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो.  शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या व्यवसापासून दूर करण्याची गरज असल्याचे सांगून शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसराच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री तसेच सेवनाला बंदी असल्याचे बोर्ड दर्शनी भागात लावण्यात यावेत.  तसेच शाळेमध्ये प्रार्थनेच्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला मी तंबाखुचे सेवन करणार नाही अशा प्रकारची शपथ देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय कार्यालयातसुद्धा तंबाखु सेवनास बंदी असल्याचे बोर्ड लावण्यात येऊन शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी किंवा अभ्यागत तंबाखु सेवन करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सुचनाही श्री जोंधळे यांनी यावेळी दिल्या. 
            शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक असल्याने तंबाखू सेवनामुळे होणारे आजार याची जनजागृती ग्रामीण भागात अधिक प्रमाणात करण्यात यावी.  ग्रामीण भागात तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या छायाचित्रांचे बोर्ड नागरिकांना सहज दिसतील अशा भागात लावण्याच्या सुचना करत अनाधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी               श्री जोंधळे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. दि.   27 जुलै  ते 3 ऑगस्ट या कालावधीत जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा यांचा कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येत असून या कालावधीत शाळा, महाविद्यालयात मौखिक आरोग्य तसेच तंबाखुमुक्त शाळाबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. तसेच मौखिक आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी पॉवर पाँईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगरेट व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 बाबत सविस्तर अशी माहिती दिली.
            या बैठकीस विक्रीकर अधिकारी एस.एम. देशपांडे, मोहिम अधिकारी अ.गो. देशपांडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) ए.बी. देशपांडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एन. बारडकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

*******     

No comments:

Post a Comment