Monday 1 January 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 


जालना, दि. 1 (जिमाका) :- इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधावर खर्च करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे. तरी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज स्वीकारण्याची मुदत दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतंर्गत जालना महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना रूपये २५,०००/- रू. भोजनभत्ता, निवास भत्ता रूपये १२,०००/- अशी एकुण ३७०००/- इतकी रक्कम मंजुर केली जाते. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखाच्या आत असणे अपेक्षीत आहे. इयत्ता दहावी, अकरावी आणि बारावी या अभ्यासक्रमास किमान 50 टक्के गुण अपेक्षीत आहेत. तसेच दिव्यांगासाठी 40 टक्के गुण अपेक्षीत आहे. सदर विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे अपेक्षीत आहे.

सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यानी त्यांचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 31 डिसेंबर 2023 पुर्वी या कार्यालयास सादर करण्यासाठी यापुर्वी कळविण्यात आलेले होते. मात्र अजुनही अनेक विद्यार्थी सदर योजनेतील अर्ज सादर केलेले नाहीत असे या कार्यालयाच्या निदर्शनास आले असल्याने दि.31 जानेवारी 2024 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. अर्जाचा नमुना व विहित कागदपत्राचा तपशील सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment