Saturday 6 January 2018

एस.टी. महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या
राज्य शासनाच्या माध्यमातुन सोडविणार  - राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर
            जालना, दि.6 -  राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत जनतेला एस.टी. महामंडळाच्या माध्यमातुन सेवा देण्यात येते. या महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या असलेल्या समस्या राज्य शासनाच्या माध्यमातुन सोडविण्यास प्राधान्‍य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.
            येथील विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना गणवेष वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री खोतकर बोलत होते.
            व्यासपीठावर भास्कर आंबेकर, बाला परदेशी, विभाग नियंत्रक प्रशांत भुसारे आदींची उपस्थिती होती.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, एस.टी. महामंडळाच्या माध्यमातुन समाजातील प्रत्येक गोरगरीबांसह समाजातील प्रत्येक नागरिकाला सेवा देण्याचे काम करण्यात येते.  आजच्या स्पर्धेच्या युगात एस.टी. महामंडळाची विश्वासार्हता आजची कायम आहे. असे असले तरी बदलत्या युगाप्रमाणे महामंडळाला बदल करावा लागेल. आजच्या महागाईच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतनावर काम करावे लागत आहे.   महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी मंडळातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांने संकल्प करण्याची गरज असुन हे महामंडळ माझे आहे या भावनेतुन काम केल्यास महामंडळाच्या उत्पन्नात भर पडून त्याचा मोबदला अधिक चांगल्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.  एस.टी. महामंडळात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या लक्ष देऊन त्या सोडविण्यावर भर देणार असल्याचेही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभाग नियंत्रक प्रशांत भुसारे यांनी सांगितले की, बदलत्या काळाप्रमाणे प्रवाशांना अधिक चांगल्या प्रमाणात सेवा देण्यासाठी एस.टी. महामंडळात अनेक बदल करण्यात येत आहेत.  त्याचाच एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना नवीन गणवेषाचे वाटप करण्यात येत आहे.  जालना महामंडळात 35 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असतानासुद्धा अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असुन दररोज 80 ते 90 हजार प्रवाशांची ने-आण करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            कार्यक्रमास पदाधिकारी  तसेच एस.टी. महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment