Friday 4 May 2018

उद्योगाचे प्रगतीचे भावी मॅग्नेट औरंगाबाद आणि जालना राहणार -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जालना, दि. 4 –देशातील सर्वोत्तम इंडस्ट्रीयल पार्क म्हणून शेंद्रा-बिडकीन उदयास येत आहे.  तसेच जालना येथे ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत असुन या ड्रायपोर्टमुळे मराठवाड्यातील उद्योजकांना त्यांचा माल सहजपणे आयात व निर्यात करता येणार आहे.  तसेच समृद्धी महामार्गाच्या माध्यमातुन हा माल कमी वेळेत जेएनपीटी पर्यंत पोहोचण्यास मदत होऊन यामुळे उद्योजकांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडणार असल्याने उद्योगाचे भावी मॅग्नेट औरंगाबाद आणि जालना राहणार असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस  फडणवीस यांनी केले.
सिरसवाडी येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे भूमीपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वृंदावन हॉल येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांशीसंवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, कुलगुरु डॉ. जे.डी. यादव, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा श्रीमती संगिता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, प्रभारी जिल्हाधिकारीपी.बी. खपले आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, भविष्यातील भारत व प्रगत राष्ट्राच्या निर्मितीचा विचार करता असताना महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील मागास भागांचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास होणार नाही.  प्रगतीमध्ये मानव संसाधनाचे मोठे महत्व असुन त्याशिवाय विकास होणे शक्य नाही. पुणेसारख्या शहरामध्ये मोठ-मोठ्या शैक्षणिक संस्था आल्या व त्या माध्यमातुन मानव संसाधनांची निर्मिती होऊन त्यानंतरच पुणे शहर हे विद्यानगरीचे उद्योगनगरी झाले. आपल्या जीवनात आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक असलेली प्रयोगशिलता निर्माण करण्याची ताकद रसायन तंत्रज्ञानामध्ये असुन या विद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला एकही विद्यार्थी रोजगारापासून वंचित राहिलेला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
रसायन तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मानव संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.  मानव संसाधनांचा मागणीएवढा पुरवठाही करता येत नसुन या क्षेत्रात मानव संसाधन तयार झाल्यास अनेक मोठ्या उद्योगांना आकर्षित करता येण शक्य आहे. रसायन तंत्रज्ञान संस्था ही केवळ रोजगार देणारी संस्था नसून या संस्थेच्या माध्यमातुन अनेक उद्योजक व संशोधक निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठवाड्याच्या विकासावर भर देण्यात येत असुन लातुरसारख्या जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्यामाध्यमातुन पाण्याची व्यवस्था निर्माण केली असुन महाराष्ट्रातला सर्वात मोठा रेल्वे कोचचा कारखाना लातुरमध्ये उभारण्यात येत आहे.  शेती, उद्योग क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात अमुलाग्र बदल पहावयास मिळणार असुन जागतिक बँकेच्या सहाय्याने 6 हजार कोटी रुपयांचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 4 हजार गावात राबविण्यात येत आहे. जालन्यामध्ये सीडपार्कची उभारणी करण्यात येत असुन या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे.  रसायन तंत्रज्ञानाचाही या सीडपार्कला मोठा फायदा होणार आहे. जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये निधीची कुठलीच कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जालना वासियांच्या आयुष्यातील आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी रसायन तंत्रज्ञान विद्यालय उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ते जालना जिल्ह्याला मंजुर झाले आहे. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी 5 हजार 334 कोटी, रस्ते विकासासाठी 7 हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन या माध्यमातुन अनेकविध कामे करण्यात येत आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातुन जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 900 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असुन 600 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.  जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन जिल्ह्यात 500 बंधाऱ्याची उभारणी करण्याबरोबरच नद्यांचु पुनरुज्जीवनही करण्यात आले असुन मराठवाड्यातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड योजना साकारण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, रसायन तंत्रज्ञानचे उपकेंद्र हे जालना येथे होत असल्याने जालनेकरांसाठी हा सौभाग्याचा क्षण आहे. मागील काळात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या माध्यमातुन जालना जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन  जालना शहराच्या भूमिगत गटार योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, सिरसवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या रसायन तंत्रज्ञानच्या उपकेंद्रासाठी 203 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली असुन यासाठी 397 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 121 शिक्षक व 128 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही मंजूर करण्यात आली आहेत.  विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे जाण्याची गरज नसून जालना येथे रसायन तंत्रज्ञान उपकेंद्राच्या माध्यमातुन दर्जेदार व रोजगार मिळवून देणारे शिक्षण घेता येणार आहे. रसायन तंत्रज्ञान संस्थेने अनेक यशस्वी उद्योजक निर्माण केलेले असुन मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या उद्योजकांचा आदर्श घेऊन आपणही केवळ रोजगार मिळविण्यासाठी नाही तर उद्योजक बनण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेची माहिती असलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, उद्योजक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-*-*-*-

No comments:

Post a Comment