Monday 14 May 2018


राष्ट्रीय रुरबन मिशनच्या माध्यमातुन
आष्टीसह 16 गावांत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात गती द्या                                             
                                            - पालकमंत्री बबनराव लोणीकर
        * कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा.
 * कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
            जालना, दि. 14 –राष्ट्रीय रुरबन मिशन हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  या प्रकल्पांतर्गत परतूर तालुक्यातील  आष्टीसह परिसरातील १६ गावांची निवड करण्यात आली असुन यासाठी १८५ कोटी  रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून 16 गावात करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच या कामांना गती देण्याचे निर्देश देऊन काम वेळेत न करणाऱ्या तसेच कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            राष्ट्रीय रुरबन योजनेसंदर्भात आष्टी ता. परतूर येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री  श्री. लोणीकर बोलत होते.
            व्यासपीठावर मदनलाल सिंगी, सुदामराव प्रधान, प्रदीप ढवळे, सरपंच श्री सादेक, रामप्रसाद थोरात, अर्जुन राठोड, रंगनाथ येवले, सिद्धेश्वर सोळंके, सुरेशराव सोळंके, पांडूआबा सोळंके, माणिकराव वाघमारे, बाबाराव थोरात, गणतपराव सातपुते, विष्णु शहाणे,अमोल जोशी, संपत टकले, प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी. खपले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, मजिप्राचे कार्यकारी अभियंता अजय सिंग, श्री डाकोरे आदींची उपस्थिती होती.
            श्री. लोणीकर म्हणाले, परतूर तालुक्यातील आष्टीसह अकोली, आनंदगाव, ब्राम्हणवाडी, सुरुमगाव, ढोकमाळ तांडा, फुलेवाडी, पळसी, हास्तुरतांडा, लिखित पिंप्री, लोणी खुर्द, कनकवाडी, परतवाडी रायगव्हाण, सातारा वाहेगाव व वाहेगाव सातारा या गावांचा राष्ट्रीय रुरबन रुरबन योजनेमध्ये समावेश करण्यात येऊन 185 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून 16 गावातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत आहे.  राष्ट्रीय रुरबन अंतर्गत आष्टी-पांडेपोखरी रस्त्यावर राज्यातील पहिली शेतकऱ्यांची मिनी एमआयडीसी उभारण्यात येत आहे.  या मिनी एमआयडीसीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना तसेच महिलांच्या बचतगटांना छोटछोटे उद्योग उभे करुन देण्यात येणार आहेत.  शेतकऱ्यांनी पीकवलेल्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा यामध्ये समावेश करण्यात आला असुन यामुळे शेतकऱ्यांनी पीकवलेल्या मालाला चांगला भावही या माध्यमातुन मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राष्ट्रीय रुरबनअंतर्गत 16 गावात विविध विकास कामे करण्यात येत असुन विद्युत विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, 16 गावात वीज सुरळीत होण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  आवश्यक त्या ठिकाणी पोल बदलण्याबरोबरच केबलही टाकण्यात येत असुन या कामांचा गती देण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात येत असलेल्या मिनी एमआयडीसीला अखंडित वीजेचा पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडरचे अंदाजपत्रकही सादर करण्याच्या सुचना विद्युत विभागाला यावेळी पालकमंत्री    श्री लोणीकर यांनी दिल्या.
            रुरबनमध्ये समावेश करण्यात आलेल्या 16 गावात सांडपाणी तसेच घनकचरा व्यवस्थापनचा प्रकल्प करण्यात येणार असुन शिवणी या गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट असे काम करण्यात आले असल्याचे उदाहरण देत प्रकल्पामध्ये समाविष्ट गावातसुद्धा शिवणीप्रमाणेच कामे करण्याची सुचना देत ज्या ज्या ठिकाणची कामे प्रलंबित असतील ती येत्या 20 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
            ग्रामपंचायत कार्यालय उभारणीच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, लोणी, आंबा व सिरसगाव येथे ग्रामपंचायतीचे सर्व सोयींनीयुक्त व अद्यावत अशी कार्यालये तयार करण्यात आलेली आहेत.  रुरबन मिशनमधील 16 गावात ग्रामपंचायतींची कार्यालयेही गुणवत्तापूर्ण व चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत.  यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन ग्रामपंचायतीनेही त्यांच्याकडे उपलब्ध असलेला निधी कार्यालयाच्या उभारणीसाठी वापरण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.
            शेतकऱ्यांच्या शेतीसह सर्वसामान्यांना शाश्वत पाणी पुरवठा व्हावा यादृष्टीकोनातुन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असुन राष्ट्रीय रुरबन मिशनमध्ये निवड झालेल्या 16 गावांमध्येही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरणाबरोबरच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्याचे निर्देश देत काकडा या गावात असलेल्या पाच खदानीमध्ये केवळ 15 लक्ष रुपयांच्या निधीमधून प्रत्येकी 20 फुटांपर्यंत पाणी साठवण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे 16 गावातही जलसंधारणाच्या कामाबरोबरच खदानीमधून पाणी साठविण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 
            जमीनीची धूप थांबून पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला असुन या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.  आष्टीसह 16 गावांमध्येही वृक्ष लागवड करण्यात यावी.  केवळ वृक्षांची लागवड करुन चालणार नाही तर लागवड केलेले वृक्ष जगली पाहिजेत यासाठीही आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री लोणीकर यांनी संबंधित विभागाला दिले.
             नळाद्वारे पाणी पुरवठा, स्वच्छता गाव अंतर्गत गटारे जोडणी, गाव अंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, एल पी जी गॅस कनेक्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्टोरेज आणि गोदाम व्यवस्था, शाळा सुधारणा,  उच्च शिक्षण सुविधा, आरोग्याच्या सुविधा दुग्ध विकास, सामाजिक न्याय, मस्त्य व्यवसाय विकास, भूजल, प्रधान मंत्री आवास यॊजना (ग्रामीण), स्मशानभूमी, अंगणवाडी, बसस्थानक उभारणी आदी विषयांचाही उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत  ही सर्व कामे येत्या 20 दिवसात सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे व एकदिलाने काम करण्याचे आवाहन करत या योजनेच्या धर्तीवर मतदारसंघात विकास कामे करुन शहरीकरणाचे स्वरुप देणार असुन केलेल्या कामांची गुणवत्ता पथकामार्फत तसेच आपण स्वत: पहाणी करणार असुन पहाणीदरम्यान कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            पिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी संबंधीत गावाच्या सरपंचांनी आपले प्रस्ताव  सादर केल्यानंतर संबंधित गावाला तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना देत जिल्ह्यात दिनांक १3 मे २०१८ अखेर 60 गावे व ०८ वाड्यासाठी १९ शासकीय तसेच 52 खाजगी अशा एकूण 71 टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा सुरु आहे . २१4 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय नळयोजना दुरुस्तीचे 233 कामे, तात्पुरत्या पुरक नळ योजनेची 20 कामे मंजूर असल्याचे सांगत पाणी टंचाई निर्माण होणार नाही यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सुचना करत टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनेचे प्रस्ताव प्राप्त होताच टंचाई आराखड्यानुसार तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देऊन टंचाई कामात हयगय केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
            बैठकीस जिल्हा परिषद, सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, 16 गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*******






No comments:

Post a Comment