Friday 18 May 2018

जालना महोत्सवानिमित्त शहरात शोभायात्रा संपन्न







       जालना, दि. 18 –  जालना शहरामध्ये 18 ते 22 मे दरम्यान जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवाच्या अनुषंगाने शहरामध्ये आज शुक्रवार दि. 18 मे रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेची सुरुवात मस्तगड येथील मम्मादेवी मंदिर येथे  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आली.  ही शोभायात्रा मुथा बिल्डिंग, महावीरचौक, मामाचौक, वीर सावरकर चौक, फुलबाजार, नेहरुरोड, काद्राबाद, मंगळबाजार मार्गे जाऊन शिवाजी चौक येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन शोभायात्रा विसर्जित करण्यात आली.   
शोभायात्रेमध्ये विविध वेशभुषेमधील स्थानिक कलावंतांसह भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हातात टाळ, वीणा घेत अभंग गाऊन या शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवत उपस्थितांचा उत्साह वाढवून या जालना महोत्सवामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.  
यावेळी घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, ह.भ.प. रमेश महाराज वाघ, विठ्ठल महाराज  यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेली  वारकरी मंडळी व विविध कलावंतांची तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment