Monday 7 May 2018

176 गावांच्या वॉटरग्रीड योजनेंतर्गत पाईनलाईन अंथरण्याची अपूर्ण कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करा कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्यावर सक्त कारवाईचा इशारा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि.7 –  जालना, परतूर व मंठा तालुक्यातील 176 गावांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटरग्रीड योजना राबविण्यात येत असुन या योजनेंतर्गत पाईप अंथरण्याची कामे कामे येत्या पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देत या कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
            वॉटरग्रीड योजनेच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता श्री लोलापोड,  ठाणे येथील गुणवत्ता पथकाचे अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, नागपूर येथील यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता किशोर शिंगरु, अधीक्षक अभियंता अजय सिंग, गुणवत्ता पथकाचे कार्यकारी अभियंता  श्री भालेराव, निम्नदुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री बनसोडे, परतूरचे उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उप अभियंता श्री कानडे, श्री पाथरवट, श्री कोलने,      श्री बंगाळे, श्री बागडे, श्री गवई, सार्वजनिक बांधकाम विभाग परतूरचे उप अभियंता श्री खोसे,           मंठा येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री खंडागळे, परतूर येथील श्री देवकर आदींची उपस्थिती होती.




            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिला परतूर,मंठा व जालना तालुक्यात समाविष्ट १७६ गावासाठी ग्रीड पद्धतीने पाणी पुरवठ्याचा 234 कोटी रुपयांचा पायलट राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पाचे 55 टक्के काम पूर्ण झाले असुन येत्या एक वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे.  पावसाळयामध्ये शेतकऱ्यांची मशागतीचे कामे सुरु होत असल्याने पाईपलाईन अंथरण्यासाठी खोदकाम करताना अडचणी येऊ शकतात.  त्यामुळे या प्रकल्पांतर्गत पाईपलाईन अंथरण्याचे काम जुनपूर्वी पूर्ण करण्यात यावे.  या योजनेंतर्गत झालेल्या कामांची तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्या गुणवत्ता पथक तसेच उस्मानाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहे.  गुणवत्ता पथकाकडून दर्शविण्यात येणाऱ्या त्रुटींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश देत ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच झाली पाहिजेत, अशा सुचनाही पालकमंत्री      श्री लोणीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
            ग्रीड योजना येत्या एक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असुन  या योजनेच्या पुर्णत्वानंतर ही गावे टंचाईमुक्त होऊन या सर्व गावांना मुबलक व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे शक्य होणार असून या गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल त्यामुळे टंचाईग्रस्त कालावधी मध्ये कराव्या लागणाऱ्या विविध उपाययोजनांच्या खर्चात शासनाची फार मोठी बचत होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            वॉटरग्रीड योजनेसाठी आवश्यक असलेल्या विद्युत जोडणी तसेच विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देत विद्युत व यांत्रिकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची मजिप्रा व महावितरणच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष फॅक्टरीमध्ये जाऊन पहाणी करावी व योग्य साहित्यच या कामासाठी वापरण्याचे निर्देश देत या योजनेसाठी दरमहा 70 लक्ष रुपयांची वीज लागणार आहे.  या योजनेसाठी सोलार प्लँट बसवल्यास दरमहा 18 लक्ष रुपयांची वीज या माध्यमातून प्राप्त होणार असल्याने वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी सांगितले.  अधीक्षक अभियंता, गुणवत्ता पथक यांनी पुरवठा विहिर, शुद्धीकरण केंद्र व संतुलन टाकी येथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची सुचना केली.  पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यास तातडीने मान्यता देऊन या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  नागपूर येथील पेरी अर्बन ही 234 कोटी रुपयांची योजना दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करुन कार्यान्वित करण्यात आली.  केवळ दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेचे भूमिपुजन करुन उदघाटन केल्याबद्दल नागपूर येथे झालेल्या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मजीप्रा व खात्याचे मंत्री म्हणून माझे कौतुक केले होते. यापासून प्रेरणा घेऊन त्याचप्रमाणे ही योजनाही विहित वेळेत पूर्ण करण्याची सुचना त्यांनी यावेळी केली.
            वॉटरग्रीड योजनेच्या स्थापत्य कामाचे सादरीकरण कार्यकारी अभियंता अजय सिंग यांनी केले तर या यांत्रिकी व विद्युत कामांची निविदा अंतर्गत समाविष्ठ असलेल्या कामांचे सादरीकरणात  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नागपुरचे कार्यकारी अभियंता किशोर शिंगरु यांनी वॉटर हॅमर कंट्रोल उपकरणे, स्वयंचलित यंत्रणेमुळे हि हेड वर्क , जलशुद्धीकरण केंद्र व वाटूर फाटा येथील पंपा साठी बसविण्यात येणार असून हि सर्व पम्पिंग मशिनरी कॉम्प्युटर च्या अत्याधुनिक सॉफ्टवेयर  (SCADA ) द्वारे जलशुद्धीकरण केंद्र येथूनच चालू बंद, नियंत्रित करता येणार असुन या मुळे देखभाल दुरुस्ती करीता मनुष्यबळ कमी लागणार आहे. फ्लोमीटरमुळे वाया जाणारे पाण्याचे परिमाण कळणार असुन यामुळे पाणी तुटीवर योग्य उपाययोजना करणे शक्य होणार आहे.  सोलार प्लँटवर तयार झालेली वीज मीटर द्वारे  महावितरण च्या मेन लाईन ला जोडून   नेट मीटरिंग जोडण्यात येणार आहे त्यामुळे सोलर द्वारे तयार होणारी वीजेचे युनिट  हे महावितरण च्या विद्युत देयकातून कमी होणार असल्याचे सांगत  एक्सप्रेस फिडरबाबतही श्री शिंगरु यांनी सविस्तर अशी माहिती दिली.
            दरम्यान जालना तालुक्यातील पाष्टा येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे वारस श्रीमती मीना उत्तम काळे यांना 1 लक्ष रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.  त्यापैकी 70 हजार रुपये श्रीमती काळे यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असुन उर्वरित 30 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
*******


No comments:

Post a Comment