Thursday 2 August 2018

‘फेक न्यूज’च्या प्रसाराला आळा घालून समाजस्वास्थ्य टिकवावे · ‘फेक न्यूज : दक्षता व परिणाम’ या विषयावर आयोजित पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेतील सूर








            जालना, दि. 2 – पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक असुन वृत्तपत्राच्या माध्यमातुन देण्यात येणारी बातमी ही विश्वासार्ह असते.  परंतू समाजमाध्यमाद्वारे देण्यात येणाऱ्या बातम्यांमध्ये विश्वासार्हता नसल्याने पत्रकारांनी फेक न्यूज व अफवांच्या प्रसाराला आळा घालून समाजस्वास्थ्य टिकवावे, असा सूर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या फेक न्युज दक्षता व परिणाम या पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत निघाला.
    या कार्यशाळेत पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय)  सोपानराव बांगर, जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर, व्ही.एस.एस. महाविद्यालयाच्या संगणशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रोहित पिपरिये, माहिती सहाय्यक अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
   यावेळी पोलीस निरीक्षक श्री गौर म्हणाले की, आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. या समाजमाध्यमांद्वारे पाठविण्यात येणाऱ्या संदेशाची शहानिशा न करता येणारा प्रत्येक संदेश फॉरवर्ड करण्यावर सहसा नेटीजन्सचा भर असतो.  शहानिशा न केल्यामुळे संदेशाच्या माध्यमातुन देण्यात आलेल्या प्रलोभनाला बळी पडल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत.  या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत असुन  यापासुन वाचण्यासाठी प्रत्येकाने आलेल्या संदेशाची शहानिशा करुनच तो संदेश पुढे पाठविण्याची गरज असल्याचे सांगत अशा प्रकारांची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाल्यास ती  जालना जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या सायबर सेल कक्षाला कळविण्यात यावी.  जेणेकरुन दोषींवर कारवाई करुन अशा घटना घडणार नाहीत, यासाठी आवश्यक ती कारवाई करणे सोईचे होणार असल्याचेही श्री गौर यांनी यावेळी सांगितले.
            प्रा. रोहित पिपरिये म्हणाले की, आजघडीला प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असुन या फोनच्या माध्यमातुन विविध ॲप्सचा वापर करण्यात येतो.  या ॲप्सचा वापर करताना सुरक्षीतता बाळगण्याची गरज असुन कुठलेही ॲप डाऊनलोड करताना त्यामध्ये देण्यात आलेले ॲग्रीमेंट प्रत्येकाने वाचुन मगच ते ॲप वापरण्याची गरज आहे. कुठल्याही संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती  अपलोड करताना ती वेबसाईट https असावी. त्या वेबसाईटच्या सुरूवातीला https असणे आवश्यक आहे.  पैशाची प्रलोभने दाखवुन अनेक फेकन्युज विविध लिंक्सच्या माध्यमातुन समाजमाध्यमांवर पाठविण्यात येतात.  या लिंक्स उघडताना त्याची सत्यता तपासून पाहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगून  फेकन्युज ओळखण्यासाठी त्या पोस्टची तारीख, पोस्टमध्ये दिलेला संपर्क क्रमांक, ज्या पोस्ट टाकलेली आहे त्या व्यक्तीचे असलेले अधिकार अथवा त्याला त्या विषयामध्ये असलेली माहिती, पोस्टचा हेतु तसेच त्याबाबतची अचूकता तपासणे गरजेचे असल्याचेही श्री पिपरिये यांनी यावेळी सांगितले.
            फेकन्युजचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉटसअप, फेसबुक या समाजमाध्यंमामध्ये बदल करण्यात आले असुन एखादी पोस्ट चुकीची अथवा फेकन्युज असेल तर Reporting Fake News  या नावाचे ऑप्शनमध्ये तशी तक्रार करण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे  सांगत फेकन्युजसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी उपस्थित पत्रकारांनी समाजमाध्यमाद्वारे पसरविण्यात येणाऱ्या विविध शंकाचे पोलीस निरीक्षक श्री गौर यांनी निरसन केले.
            कार्यशाळेचे आभार पोलीस उपअधीक्षक श्री बांगर यांनी मानले. 
            या कार्यशाळेस विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, जिल्हा प्रतिनिधी, छायाचित्रकार,  इलेक्टॉनिक्स प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेरामन यांच्यासह पोलीस व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
*******

No comments:

Post a Comment