Tuesday 14 August 2018

युवा माहिती दूत उपक्रमात युवापिढीने हिरीरीने सहभाग नोंदवावा जालना जिल्हा युवा माहिती दूत उपक्रमात राज्यात अव्वल यावा - पालकमंत्री बबनराव लोणीकर


जालना, दि. 15 – केंद्र व राज्य शासनामार्फत सर्वसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.  या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असले तरी युवापिढीने या योजनांची माहिती घेऊन त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा माहिती दूत उपक्रमामध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचा उच्च शिक्षण विभागआणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने‘युवा माहिती दूत’ हा उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आला.
            याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्या, रामेश्वर भांदरगे, उद्योजगपती घनश्यामसेठ गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, माहिती सहाय्यक अमोल महाजन, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक सोमिनाथ खाडे, अनुलोम संस्थेचे सुरेश पोहार आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासन गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेकविध योजना राबविते.  या योजनांची माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क खात्याच्यावतीने वृत्तपत्रे, ईलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल माध्यमाद्वारे पोहोचविण्यात येते.  शासनाच्या योजनांची माहिती अधिकगतीने  शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा पिढीने पुढे येण्याची गरज असुन शासनाच्यावतीने राज्यात राबविण्यात येत असलेल्या युवा माहिती दूत उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी हिरिरीने सहभाग नोंदवून शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होऊन  या उपक्रमात जालना जिल्हा राज्यात प्रथम येईल यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती सहाय्यक अमोल महाजन यांनी  युवा माहिती दूत या उपक्रमाबद्दल सविस्तर अशी माहिती दिली.
            सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते युवा माहिती दूत या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातुन या उपक्रमाची माहिती असलेला व्हिडीओ उपस्थित मान्यवरांना दाखविण्यात आला.
            कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, प्रा. सुभाष वाघमारे, प्रा. डॉ. वणंजे, प्रा. डॉ. संतोष देशपांडे, प्रा. मिर्झा शेख, प्रा. डॉ. सुधाकर जाधव, प्रा. देवडे, अनुलोम संस्थेचे संदीप बोंदरवाल, महामित्र गणेश राऊत, सौरभ पंच, अप्पासाहेब चेंडे, अनिल खंदारे यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******









           

No comments:

Post a Comment