Thursday 16 August 2018

बदनापूर तालुक्यातील बोंडअळीने प्रादुर्भावग्रस्त गावांची राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून पहाणी



            जालना, दि. 16 – बोंडअळीने प्रादुर्भावग्रस्त झालेल्या बदनापुर तालुक्यातील मात्रेवाडी व सेलगाव येथील शेतपिकाची राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतावर प्रत्यक्ष जाऊन पिकाची पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधुन झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावाची माहिती घेतली.
            यावेळी आमदार नारायण कुचे, लक्ष्मण मोहिते, गजानन राजबिडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  व्ही.एस. माईनकर आदींची उपस्थिती होती.
            राज्यमंत्री श्री खोत यांनी सर्वप्रथम  सेलगाव येथील शेतकरी हरिभाऊ अंभोरे यांच्या शेतामध्ये जाऊन पिकावर प्रादुर्भाव झालेल्या बोंडअळीची पहाणी करुन कापसाची लागवड कधी करण्यात आली होती.  बोंडअळीच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आदी माहिती जाणून घेत मात्रेवाडी येथील शेतकरी शिवाजी रामराव महाडीक यांच्या शेतात जाऊन तेथील कापूस पिकाची पहाणी केली.   
            यावेळी राज्यमंत्री श्री खोत म्हणाले की, जालना जिल्ह्यात 113 गावात 20 हजार 200 हेक्टर क्षेत्राला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.  बोंडअळीच्या प्रादुर्भावाची कारणे शोधण्यात आली असुन यावर उपाययोजना करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे उपलब्ध करुन देण्याबरोबरच लिंबोळी अर्क, किटकनाशकेही अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.  पेरणीपूर्वी राज्यात शेतकरी संवाद अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्याची माहिती देत या अभियानाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी कोणत्या कंपनीचे बियाणे वापरले आहे, पेरणी केव्हा केली आहे व कोणती काळजी घेतली आहे ही माहिती सदरील अभियानादरम्यान कृषि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतली आहे.  राज्यात व्हिलेज, कॉलेज व नॉलेज हे अभियान राबविण्यात येत असुन कृषि अधिकाऱ्यांसह कृषि विद्यापीठातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना एकत्रितपणे मदत करत असल्याचेही राज्यमंत्री श्री खोत यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी रवी इचे, दत्तराव खराबे, कैलास डोंबे,संतोष खराबे, शिवनाथ जाधव, जितु आलेडकर, यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
            तत्पूर्वी राज्यमंत्री श्री खोत यांनी वाटुर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांशीही संवाद साधला.
राज्यमंत्री श्री खोत यांनी घेतला आढावा
            बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्र येथे कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बोंडअळीसंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा राज्यमंत्री श्री खोत यांनी घेतला.
            यावेळी आमदार नारायण कुचे, पं.सं. सदस्य श्री शिंदे,  डॉ. जहागीरदार, प्रभारी अधिकारी एम.बी. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व्ही.एस.माईनकर यांच्यासह सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
            राज्यमंत्री श्री खोत म्हणाले की, मात्रेवाडी तसेच सेलगाव येथे कापूस पिकाची पहाणी केली असता कापसाच्या पिकामध्ये आंतरपीकांचा आभाव आढळून आला.  जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी कापूस पिकामध्ये आंतरपीक घेतले, नॉनबीटीची लागवड केली आहे काय याबाबत सर्वेक्षण करण्याच्या सुचना देत तालुका कृषि अधिकाऱ्यांना दर आठवड्याला गावभेटीचे उद्दिष्ट देण्यात येते.  तालुका कृषि अधिकाऱ्यांनी गावभेटीची तारीख व वेळ असलेले बोर्ड प्रत्येक गावात लावण्याचे निर्देश देऊन जे अधिकारी, कर्मचारी कामात हयगय अथवा कुचराई करतील अशांवर कारवाईचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  मागेल त्याला शेततळे योजनेचा आढावा घेऊन शेततळयाचे जिओटॅगिंगचे काम वेगाने करण्याचे निर्देशही श्री खोत यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.  दरम्यान बदनापूर येथील कृषि महाविद्यालयास भेट देऊन तेथील कामकाजाची पहाणी करत विद्यार्थींनीशीही संवाद साधला.
*******






No comments:

Post a Comment