Wednesday 23 November 2022

अंमली पदार्थांविषयी माहिती जवळचे पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला तात्काळ द्यावी - जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे


 


जालना, दि. 23 (जिमाका) :- अंमली पदार्थासंबंधीची विक्री, साठवणूक अथवा वाहतुकीबाबतचे कृत्य जिल्ह्यात कुठे होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळचे पोलिस स्टेशन, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष किंवा डायल 112 वरती ही माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले आहे. अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन करताना ते बोलत होते. 

डॉ. शिंदे म्हणाले की, जिल्हयात अंमली पदार्थाच्या वापरास प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून जर कुणी अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक अथवा वाहतुक करताना आढळल्यास  जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून  विविध उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी अंमली पदार्थांचे अजिबात सेवन करु नये, याच्या सेवनाने आपल्या शरीरावरती अत्यंत घातक  परिणाम होवून यातून आपल्याला आणि आपल्या परिवाराला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.  त्यामुळे अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर रहावे, तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीस समजावून त्याची मानसिकता बदलण्यावर भर द्यावा. तसेच अंमली पदार्थाबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ  पोलिस विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी  केले.

-----

 

No comments:

Post a Comment