Tuesday 29 November 2022

जागतिक एड्स दिनानिमित्त 1 ते 31 डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन यावर्षीची थिम "आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरीता" *1 डिसेंबरला सामान्य रुग्णालय, जालना येथून सकाळी 9 वाजता रॅलीचे आयोजन

 


 

            जालना दि. 29 (जिमाका) :-  जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर  रोजी साजरा केला जातो. युवा वर्ग हा एचआयव्ही/ एड्स संदर्भात अधिक संवेदनशील असून या निमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही एड्स संदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. युवा वर्ग हा सृजनशील असल्याने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन त्यांच्यात जागृती आणता येईल  यासाठी जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जालना जिल्ह्यात युवा पिढीमध्ये एड्स विरोधी अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यात दि.1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी एड्स दिनानिमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवक-युवतींनी सहभाग नोंदवावा,  असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

या वर्षीची थिम  "आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता" अशी असून मोफत तपासणी व मोफत उपचार यावर जास्त लक्ष केंद्रीत करुन 1 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये अतिजोखमीचे गट, स्थलांतरीत कामगारांच्या रहिवाशी तसेच कामाच्या ठिकाणी, मुख्य चौक, बाजार, गर्दीचे इत्यादी ठिकाणी व्यापक प्रमाणात जनजागृती करुन मोहिम अधिक प्रभावी करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना एचआयव्ही तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे. जे एआरटी औषधोपचारांपासून दुरावले आहेत, उपचारात खंड पडला आहे अशा सर्वांना पुन्हा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाशी जोडावे इत्यादी उदिद्ष्टे साध्य करण्यासाठी वैयक्तिक, सामाजिक व सरकारी पातळीवर जबाबदारी घेऊन व जागरुक राहून सातत्याने  जागतिक एड्स दिनानिमित्त येणारे उपक्रम हे मुख्यत: जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या रुग्णांच्या एचआयव्ही संसर्ग  प्रभावित भागात व गटात तसेच जिल्ह्याच्या रिस्क प्रोफाईलनुसार राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यांतील विविध खाजगी संस्थांना प्रोत्साहीत करण्यासाठी अथक प्रयत्न करुन विविध स्थानिक तथा खाजगी संस्थांच्या आर्थिक सहाय्यातुन एचआयव्ही, एड्स विषयी जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृती उपक्रमाचा सकारात्मक उद्देशाचे फलित, मुख्यत: अतिजोखमीच्या गटात पोहचून त्यांची तपासणी करुन एचआयव्ही, एड्स पॉझिटीव्ह रुग्ण शोधणे हे आहे.

            हा दृष्टिकोन ठेऊन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाकडुन जागतिक एड्स दिना निमित्त जिल्हाभरात दि. 1 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात  आले आहे. यात दि. 1 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथून तसेच अंबड उप जिल्हा रुग्णालय व सर्व ग्रामीण रुग्णालयातूनही सकाळी 9 वाजता रॅली काढण्यात येणार असून याच दिवशी सामान्य रुग्णालयाकडून एचआयव्ही/एड्सबाबत कलंक व भेदभाव मिटविणे याबाबत पथनाट्य स्पर्धा घेण्यात येईल. दि.1 ते 31 डिसेंबरपर्यंत तालुकास्तरावर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात एचआयव्ही/एड्सबाबत कलंक व भेदभाव मिटवून समानता आणणे या विषयावर चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात येतील. तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व महाविद्यालयात एचआयव्ही/एड्स विषयी मुलभूत माहिती, एचआयव्ही प्रतिबंध, एचआयव्हीमुळे देशाच्या विकासावर होणारा परिणाम, एचआयव्ही संदर्भात तरुणांची भूमिका व जबाबदारी आदि विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजनही करण्यात येणार आहे. चित्रकला व रांगोळी स्पर्धेमध्ये रेड रिबन क्लबच्या सदस्यासह जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालयांकडून करण्यात आले आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment