Wednesday 12 April 2023

जात वैधता प्रमाणपत्रासाठी एक दिवसीय सामाजिक समता शिबीराचे 18 एप्रिल रोजी आयोजन

 


 

 जालना, दि. 12 (जिमाका) :-  जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती जालना कार्यालयात विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले आहेत. अर्जातील त्रुटी पूर्ण करण्यासाठी संबंधित अर्जदारास पत्राद्वारे कळविण्यात आले असून जात वैधता प्रमाणपत्राच्या अर्जातील त्रुटीची पुर्तता करण्यासाठी एक दिवसीय सामाजिक समता शिबीराचे दि.18 एप्रिल 2023 रोजी  आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित विद्यार्थी व पालकांनी शिबीराच्या दिवशी हजर राहून त्रुटीची पुर्तता करावी. असे आवाहन वैशाली हिंगे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

इयत्ता अकरावी व बारावी वर्गाच्या विज्ञान शाखेत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित असलेले विद्यार्थी, सीईटी देणारे व डिप्लोमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र  पडताळणीचे अर्ज ऑनलाईन या कार्यालयात सादर केले असून या अर्जामध्ये जाती दाव्यानूसार व वंशावळीनूसार शालेय, महसूली पुरावे सादर केलेले नसल्याने हे अर्ज त्रुटीमध्ये काढण्यात आले आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा जाती प्रमाणपत्र  पडताळणी समितीकडून त्रुटी  पूर्णतेबाबत पत्र देण्यात आले आहे, अशा विद्यार्थ्यांने अथवा पालकांनी दि.18 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र  पडताळणी समिती कार्यालय जालना येथे उपस्थित राहून त्रुटीची पुर्तता करावी. जेणेकरुन अर्जदारांना समितीकडून विहीत कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे सोईचे होईल. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात पडताळणीचे प्रस्ताव सादर केले नाही त्यांनी लवकरात लवकर  प्रस्ताव सादर करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. असे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment