Friday 21 April 2023

अक्षयतृतीयानिमित्त होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

 


  जिल्हाधिकारी  डॉ.विजय राठोड यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश

जालना, दि. 21 (जिमाका) :-  जिल्ह्यात अक्षयतृतीयानिमित्त शनिवार, दि. 22 एप्रिल 2023 रोजी संभावित बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसह बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना  दिले.

अक्षयतृतीयाच्या दिवशी होणारे बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी  डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.एन.चिमंद्रे, गजानन इंगळे, सचिन चव्हाण यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

अक्षयतृतीयानिमित्त होणारे बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांनी पुढील सूचना दिल्या. बालविवाह  निर्मुलन व प्रतिबंधाबाबत सर्व गावांमध्ये दवंडी देणे. दवंडीद्वारे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे तसेच 21 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाचे विवाह लावणे हा बालविवाह समजण्यात येईल व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार सर्व संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल, असे आवाहन करावे. आपल्या गावामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच बालविवाह होत असल्यास 1098 या क्रमांकावर फोन करुन माहिती देण्यात यावी. असेही आवाहन करावे.  अक्षयतृतीयेच्या दिवशी सर्व ग्रामसेवकांनी गावातच थांबुन बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी बालविवाहाचे प्रकरण प्राप्त झाल्यास, बालविवाह निर्मुलन कृती आराखडयात नमुद प्रक्रीयेनुसार कार्यवाही करावी. अक्षयतृतीयेच्या दिवशी बालविवाह झाल्यास संबंधित ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी तात्काळ संबंधितावर गुन्हे दाखल करावे. दि.22 एप्रिल 2023 रोजी शिक्षक शाळेवर उपस्थित राहतील जेणेकरुन आवश्यकता पडल्यास बालविवाह संदर्भात वयाची खात्री करण्याकरिता प्रवेश निर्गम उतारा वेळेत मिळु शकेल याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत शिक्षकांना सूचना देण्यात याव्यात. महिला बचतगट, गावातील स्वयंसेवक यांच्यामार्फत गावात बालविवाह निर्मुलनासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात यावे. गावात ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे इ. ठिकाणी चाईल्डलाईन नं.1098 हा हेल्पलाईन क्रमांक व आपल्या गावात बालविवाह होत असल्यास कळवावे आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असा संदेश भिंतीवर पेंट करावा. बालविवाहबाबतची माहिती दर महिन्याला ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी गुगल फॉर्ममध्ये भरावी. त्याचबरोबर बालविवाह अधिसुचना दि.31 ऑक्टोबर 2022 नुसार आवश्यक नमुना तीनमध्ये मासिक अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना सादर करण्यात यावा. गटविकास अधिकारी यांनी सर्व अधिनस्त ग्रामसेवकांना लेखी सुचना, आदेश तात्काळ निर्गमित करावेत. अशा सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधित  यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment