Wednesday 19 April 2023

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त जाफ्राबाद येथे पत्रकारांसाठी कायदेविषयक साक्षरता या विषयावर कार्यशाळा संपन्न

 



 

जालना, दि. 19 (जिमाका) :-  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जाफ्राबाद येथे आज माध्यम प्रतिनिधींसाठी कायदेविषयक साक्षरतेची कार्यशाळा व राज्यघटनेतील मुल्यांची ओळख या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

जाफ्राबाद येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक ॲड. शरद सिरसाट, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे,  गटविकास अधिकारी विष्णू बोडखे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश मिरगे यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल परेदशी, मिलिंद तूपसमिंद्रे यांच्यासह मोठया संख्येने पत्रकार उपस्थित होते.

ॲड.  शरद सिरसाट म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी पत्रकारिता ही प्रामुख्याने करण्यात येत होती. स्वातंत्र्यानंतर सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडून विविध पातळीवर न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारांच्या हातून होत आहे. पत्रकार संरक्षण कायद्यातून पत्रकारांना सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला  तर आरोपीला किमान 3 वर्षे शिक्षा व 50 हजार रुपये दंड अशी तरतूद आहे. जर एखाद्या पत्रकाराच्या कार्यालयावर हल्ला झाला आणि कार्यालयाचे नुकसान झाल्यास नुकसान रक्कमेच्या दुप्पट रक्कम ही दंड म्हणून पत्रकाराला दिली जाते.  पत्रकारांनी बातमीमध्ये काय छापावे किंवा काय छापू नये यासाठी बातमीचे लिखाण करीत असताना सजगता बाळगणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शासनस्तरावर पत्रकारांच्या कल्याणासाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, म्हाडाच्या घराच्या सोडतीमध्ये राखीव जागा अशा विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात.

गटविकास अधिकारी श्री. बोडखे म्हणाले की, जाफ्राबाद तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव खूप  उत्साही असून प्रशासनाला नेहमी सहकार्य करणारे आहेत. शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यत पोहचवून सामान्यांना न्याय देण्याचे काम पत्रकार करतात. सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी पत्रकार नेहमी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. धोंगडे यांनी आयोजित कार्यशाळेमागील महत्त्व विषद केले. पत्रकारांसाठी असणाऱ्या सेवांची त्यांनी माहिती दिली. जेष्ठ पत्रकार गजानन उदावंत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाबळे यांनी केले.  जिल्हा माहिती कार्यालयाचे मिलिंद तुपसमिंद्रे यांनी आभार मानले.  कार्यशाळेस पत्रकार चेतन बायस,  वाहेद पटेल, गोपाल अक्कर, शेख कदीर, मुकेश भारद्वाज, उदय मुळे, विशाल वाकडे, मुजाहेद पठाण, मंगल भारद्वाज, विजय खरात, भरत लहाने, प्रल्हादराव लोणकर, गजानन बरडे, शेख अजीम यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment