Wednesday 18 January 2017

पंचायत समिती सभापती पदासाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर



जालना दि. 18 :- जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्‍ह्यातील आठही पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आले.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, तहसिलदार श्रीमती अनिता भालेराव, नायब तहसिलदार श्री खटावकर यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शेळके म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून उमेदवारांनी इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणाहून अर्ज भरुन विहित वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्यांच्या नावे खाते उघडून घ्यावीत.  तसेच निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत खर्चाचा तपशिल सादर न करणाऱ्या उमेदवारांना पुढील सहा वर्षासाठी निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.  निवडणुका सुरळीत व पारदर्शी होण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून 7 उपजिल्हाधिकारी दर्जाचे तर एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्या त्या तहसिल कार्यालयाचे तहसिलदार हे सहाय्यक म्हणून काम पहाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या विविध सूचना आणि मार्गदर्शक तत्वे, सूचना यांची माहिती उपस्थित राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
            दरम्यान पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण शालेय विद्यार्थीनींच्या हस्ते काढण्यात आले. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे

1 मंठा (अनुसूचित जाती)
2 बदनापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला)
3 भोकरदन (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
4 अंबड, घनसावंगी,परतूर ( सर्वसाधारण – महिला)
5 जाफ्राबाद, जालना (सर्वसाधारण)
***-***


No comments:

Post a Comment