Tuesday 24 January 2017

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेले काम चोखपणे व जबाबदारीने पार पाडावे - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना, दि. 24 – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांनी दिलेले काम चोखपणे व जबाबदारीने पार पाडण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिल्या.
            जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2017 साठी नियुक्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडुळकर, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण श्री शिंदे, तहसिलदार श्रीमती अनिता भालेराव, नायब तहसिलदार श्रीमती खटावकर आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने तसेच मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.  यासाठी आवश्यक तेवढी शासकीय तसेच खाजगी वाहने अधिग्रहीत करण्यात यावीत. उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व परवान्याग्या देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याने तालुकास्तरावर एकखिडकीच्या माध्यमातून परवानग्या देण्याची व्यवस्था करण्यात यावी. उमेदवारांना निवडणुकीचा खर्च ऑनलाईन सादर करावयाचा असल्याने तालुकास्तरावर उमेदवारांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            यावेळी निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशिन्स, ‘कॉप’ (COP) सिटिझन ऑन पेट्रोल मोबाईल अॅप, आचारसंहिता यासह इतर बाबींचाही जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीस निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment