Tuesday 3 January 2017

सर्वसामान्य माणसाला न्याय देऊन त्यांच्या मनातील महाराष्ट्र निर्मितीसाठी शासन कटिबद्ध – शालेय शिक्षण मंत्री श्री तावडे



जालना, दि. 3 – गत दोन वर्षापासुन राज्य शासन पारदर्शीपणे व गतिमानतेने काम करत असून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याबरोबरच त्यांच्या मनातील महाराष्ट्र निर्मितीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
            परतूर येथे 176 गावांच्या ग्रीड पद्धतीने पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन श्री तावडे यांच्या हस्ते करण्यात आले तर 220 के.व्ही. विद्युत केंद्राचा लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम श्री तावडे बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलास खरात, माजी आमदार अरविंद चव्हाण,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, राहुल लोणीकर, रामेश्वर भांदरगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री तावडे म्हणाले की, गत दोन वर्षामध्ये जालना जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून जलयुक्त शिवार, रस्तेविकास, विद्युत विकास यासारखी अनेकविध  विकास कामे यशस्वीपणे करण्यात येत आहेत.  श्री लोणीकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यास एक खंबीर असे नेतृत्व प्राप्त झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निश्चलीकरण करण्याच्या निर्णयामुळे देशातील बँकांमध्ये जवळपास 14 लाख कोटी रुपयांचे चलन जमा झाले आहे.  या चलनाच्या माध्यमातून देशात येणाऱ्या काळात अनेकविध विकास कामे राबविण्यात येणार असून या धाडसी निर्णयाला महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी त्रास सहन करत दिलेल्या पाठींब्याबद्दल शासनाच्यावतीने त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.
            वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,  शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक प्रमाणात पाणी व योग्य दाबाने वीज देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.  राज्यात अनेक वर्षापासून सिंचनाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत.  केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिचाई योजनेच्या माध्यमातून राज्याला 18 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येणाऱ्या काळात प्रलंबित सर्व प्रकल्पाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.


जालना जिल्ह्यातील निम्नदुधना प्रकल्पाचे कामही अनेक दिवसापासून प्रलंबित होते.  पंतप्रधान सिचाई योजनेमधून या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून हे कामही तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या संपादित करण्यात आलेल्या जमीनीचा मावेजा देण्यासाठीही निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, गेल्या दोन-वर्षात  जनतेला दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागल्या.  राज्यात 6 हजार टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात आला तर लातुर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला.  या सर्व बाबींचा विचार करुन गुजरात, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याच्या धर्तीवर मराठवाड्यातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत                15 हजार कोटी रुपयांच्या वॉटरग्रीड योजनेस तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.  234 कोटी रुपये खर्चून परतूर येथे करण्यात येत असलेल्या राज्यातील पहिल्या वॉटरग्रीड योजनेच्या माध्यमातून मंठा, परतूर व जालना तालुक्यातील 176 गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            ग्रामीण भागातील जनतेला योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात 33 के.व्ही ची उपकेंद्रे मंजुर करण्यात आली असून मंठा व परतूर शहरासाठी लोकार्पण करण्यात आलेल्या 220 के.व्ही. केंद्राच्या माध्यमातून अखंडितपणे वीज पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे सांगत  जिल्ह्यातील अपूर्ण असलेले सिंचनाचे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी अधिकचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली. 
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून सिंचन, आरोग्य, शिक्षण यासह इतर सर्व बाबींचा अनुशेष भरुन काढत जिल्ह्याची यशस्वीपणे विकासाकडे वाटचाल सुरु असून राज्यातील पहिली वॉटरग्रीड परतूर येथे होत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, परतूर शहरात उभारण्यात येणाऱ्या ग्रीडवॉटर योजनेप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यासाठी अशी एक योजना येणाऱ्या काळात उभी करावी.  जिल्ह्याची पारदर्शीपणे व गतिमानतेने विकासाकडे वाटचाल सुरु असून  सर्वसामान्य व्यक्ती तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            अध्यक्षीय समारोपात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.  या सर्व योजनांची परिपूर्ण माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा. राज्यात पाण्याचे शाश्वत साठे निर्माण करण्यासाठी गत दोन वर्षापासून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान अत्यंत उपयुक्त ठरले आहे.  येणाऱ्या काळातसुद्धा प्रत्येक गावात पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नद्यांचे खोलीकरण, रूंदीकरण करण्याबरोबरच पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंब जमिनीमध्ये अडविणे व जिरवणे गरजेचे आहे.

            जालना जिल्ह्याला गतकाळात 434 कोटी रुपयांचा पीक विमा प्राप्त झाला असल्याचे सांगत येणाऱ्या काळातही प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपिकाचा विमा काढण्याचे आवाहन करुन  केंद्र शासनाच्या जीवनसुरक्षा योजना तसेच अटल पेन्शन योजनेचाही प्रत्येकाने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
परतूर व जाफ्राबाद तालुके हागणदारीमुक्त
            जालना जिल्ह्यातील परतूर व जाफ्राबाद हे दोन तालुके हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केली. संपूर्ण मराठवाड्यात परतूर व जाफ्राबाद तालुके स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हागणदारीमुक्त करणे शक्य झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  परतूर व जाफ्राबाद तालुके हागणदारीमुक्त झाल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते पालकमंत्री श्री लोणीकर यांच्यासह स्वच्छता विभागातील सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
            या कार्यक्रमास विजय गव्हाणे, भाऊराव देशमुख, विरेंद्र धोका, सुनिल आर्दड, विलास नाईक, गोपाळराव बोराडे, भाऊसाहेब कदम, हररिम माने, मदनलाल सिंगी, शहाजी राक्षे, गणेश खवणे, माऊली शेजुळ, राजेश मोरे, शिवाजी सवणे, शंतनु काकडे, सुरेश कदम, प्रकाश चव्हाण, संदीप बाहेकर, कृष्णा आरगडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत ताठे, गजानन देशमुख, दारासिंग चव्हाण, गणेश काजळे, लक्ष्मण इलग यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार यांच्यासह पंचक्रोशितील नागरिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***




No comments:

Post a Comment