Monday 6 March 2017

नामांकित छायाचित्रकारांचे "महाराष्ट्र माझा" प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

जालना -  प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या प्रदर्शनाचे आयोजन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जालना येथे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, ज्येष्ठ छायाचित्रकार बाबुराव व्यवहारे, लक्ष्मण राऊत, तालुका विधी न्या विभागाचे समन्वये ॲड पी.जे. गवारे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत ठक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनात कला, संस्कृती, इतिहास वारसा यासह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा समावेश असलेल्या विषयावरील अप्रतिम अशा छायाचित्रांचा समावेश करण्यात आला असून या प्रदर्शनाचा लाभ शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनींसह सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे जालना जिल्ह्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथील हॉलमध्ये हे प्रदर्शन आज दि. 6 मार्च, 2017 पासून भरविण्यात आले असून 15 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री बावस्कर यांनी यावेळी सांगितले.
 या उदघाटन समारंभास पत्रकार अंकुश गायकवाड, अभयकुमार यादव, नारायण माने, अतुल व्यवहारे, अनिल व्यवहारे, साबेर खान, जावेद तांबोळी, किरण खानापुरे, सुनिल खरात, शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******







No comments:

Post a Comment