Friday 3 March 2017

श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या 16 गावांच्या विकास कामांचा डीपीआर तातडीने सादर करा– पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना –   केंद्र शासनाच्या श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये परतूर तालुक्यातील 16 गावांचा समावेश करण्यात आला असून या गावांमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, परतूर तालुक्यातील आष्टीसह अकोली, आनंदगाव, ब्राम्हणवाडी, सुरुमगाव, ढोकमाळ तांडा, फुलेवाडी, पळसी, हास्तुरतांडा, लिखित पिंप्री, लोणी खुर्द, कनकवाडी, परतवाडी रायगव्हाण, सातारा वाहेगाव व वाहेगाव सातारा या गावांचा श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.  या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे असून निवड झालेल्या गावांमध्ये आर्थिक व तांत्रिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे.  त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी या गावांचा विकास करण्यासाठी जबाबदारीने व समन्वयाने कामे करावीत.  या कामात हगगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्री       श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.          
 श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत निवड झालेल्या गावात विकास कामे करण्यासाठी राज्य शासनामार्फत 70 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून उर्वरित 30 टक्के निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  या 16 गावांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, स्टोरेज आणि गोदाम, मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा, उच्चशिक्षण सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गावअंतर्गत गटारे, रस्त्यावरील पथदिवे, गावअंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतुक, एलपीजी गॅस कनेक्शन, डिजिटल साक्षरता, नागरी सेवा केंद्रे आदी सुविधा उपलब्ध करुन द्यावयाच्या आहेत.  गावात कामे करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव श्री भालेराव यांनी योजनेचे महत्व व कशापद्धतीने ही योजना राबवावयाची आहे या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांनासविस्तर अशी माहिती दिली. तर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आजपर्यंत या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा व केलेल्या नियोजनाचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
            या बैठकीस संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment