Friday 19 August 2016

“स्वच्छ महाराष्ट्रासाठी 18 लाख गृहभेटी, कुटूंबस्तर संवाद अभियानात” राज्यात राबविणार सर्वांनी सहभाग नोंदवावा – पालकमंत्री बबनराव लोणीकर

                           अभियानाच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात 63 हजार गाठीभेठीचे नियोजन
                           अभियानादरम्यान सेल्फी विथ स्टीकर अनोखा उपक्रम राबविणार
               अभियान यशस्वी करण्यासाठी उद्योजकांबरोबरच साधु-संतांची मदत 
         जालना - महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छतेसंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख गृहभेटी  हा उपक्रम राबविण्यात आहे. जालना जिल्ह्यातही या अभियानांतर्गत 63 हजार कुटूंबाच्या गाठीभेठीचे नियोजन करण्यात येत असून या अभियानात सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवून राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 
            22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात कुटूंबस्तर संवाद 18 लाख गृहभेटी अभियान राबविण्यात येणार असून स्वच्छ व सुंदर जालना जिल्ह्यासाठी 63 हजार गाठीभेठीच्या नियोजनासंदर्भात मराठवाड्यातील स्वच्छता विभागांशी निगडीत अधिकारी तसेच जालना जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी  मातोश्री लॉन्स, अंबडरोड, जालना येथे दि. 19 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, संचालक (वासो) मुंबई सतीष उमरीकर, जयंत रसाळ, राहूल लोणीकर, अपर पोलीस अधीक्षक राहूल माकणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, युनिसेफचे जयंत देशपांडे, प्रचार व प्रसार सल्लागार कुमार खेडकर, उद्योगपती राम भोगले, विवेक देशपांडे, मनिष धुत, सुनिल रायठ्ठा, धनश्यामसेठ गोयल, सुनिल आर्दड, किशोर अग्रवाल, नामदेव चारठाणकर महाराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जी. ताठे, भुपेश पाटील, नम्रता गोस्वामी, वास्तु विशारद सतीष नागरे आदींची उपस्थिती होती.
            यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनाद्वारे जनतेला स्वच्छतेचा संदेश गावोगावी दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनीही संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  राज्यात 7 हजार 314 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील 15 तालुके पूर्णत: हागणदारी मुक्त झाले असून चालु वर्षात राज्यातील 13 जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर अभियाना दरम्यान शौचालय नसलेल्या राज्यातील 18 लाख कुटूंबियांपर्यंत पोहोचून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री मंडळातील सर्व मंत्री, मुख्य सचिव, विविध खात्याचे सचिव तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व अधिकारी या अभियानांतर्गत प्रत्येकी एका गावास भेट देऊन कूटूंबस्तरावर शौचालयाचे महत्व पटवून देणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

..2..

जालना जिल्ह्यात अभियानादरम्यान 63 हजार कुटूंबियांच्यागाठी भेठी
             जालना जिल्हाही या अभियानात मागे राहू नये यासाठी हे अभियान जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यासाठी व जिल्ह्यातील 63 हजार कुटूंबियांच्या या अभियानादरम्यान गाठीभेठी घेण्यासाठी नियोजन करण्यासंदर्भात राज्यातील पहिल्या अशा आगळयावेगळया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या अभियानादरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे.  ही मोहिम केवळ अभियानापुरती न राहता ती एक स्वच्छतेची लोकचळवळ होऊन नागरिकांनी अधिकाधिक शौचालयांची उभारणी करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
सेल्फी विथ स्टीकर अनोखा उपक्रम राबविणार
            या अभियानादरम्यान जनतेच्या भेठीगाठी घेत असताना ज्यांच्याकडे शौचालय आहेत त्यांच्या घराच्या दारावर लयभारी अशा मजकुराचे हिरव्या रंगाचे स्टीकर व ज्यांच्याकडे शौचालय नाहीत अशा कुटुंबाच्या दारावर धोक्याचा इशारा देणारे लाल रंगाचे स्टीकर चिटकविण्यात येणार असून हे स्टीकर चिटकवताना सेल्फी विथ स्टीकर हा अनोखा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
अभियान यशस्वी करण्यासाठी उद्योजकांबरोबरच साधु-संतांची मदत
            22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2016 दरम्यान राज्यात राबविण्यात येत असलेल्या 18 लाख गृहभेटी कुटूंबस्तर अभियान यशस्वी करण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था, उद्योगपतींची मदत घेण्यात येणार असून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्यातील साधु-संत, महंत, विविध धर्माचे गुरु आपल्या किर्तनाच्या, प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणार असून राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांसह  विद्यार्थी विद्यार्थीनींनी या अभियान सहभाग नोंदवावा,असेही श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            स्वच्छतेचे महत्व पटवून देतांना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, स्वच्छता ही यशाची गुरुकिल्ली आहे.  स्वच्छतेमुळे मानवी आरोग्य सदृढ राहण्याबरोबरच मनही प्रसन्‍न राहते.  अस्वच्छतेमुळे मानवाला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.  स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे सांगत आपले तन व मन सदृढ राहण्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकाने अंगिकारण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
             राज्यातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने राज्य शासन आपले काम सक्षमपणे करीत असून राज्यातील प्रत्येक नागरिक सुखी व्हावा, प्रत्येकास चांगले आरोग्य अणि शिक्षण मिळण्याबरोबरच देश हागणदारीमुक्त झाला पाहिजे.  यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात हिरिरीने सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी केले.
            खेडयाचा विकास झाला तरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होऊन देश बलशाली होईल.  राज्यात आदर्श ग्राम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून आपण स्वत: सहा गावे दत्तक घेऊन ती आदर्शग्राम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  या गावांमध्ये अनेकविध सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगत 21 प्रकारची कामे करण्यात येत आहेत.  तसेच हवेतुन पाणी शोषून घेऊन शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणाऱ्या आकाश अमृत मशिन्सही या गावांमधून कार्यान्वित करण्यात येऊन या गावांना पिठाच्या गिरण्या उपलब्ध करुन देण्यात आल्या असून या गिरण्यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना मोफत दळण देण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            गेल्या तीन वर्षापासून राज्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले असून यासाठी केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही तर यासाठी आपणही कारणीभूत आहोत.  मुबलक प्रमाणात पाऊस पाडण्यासाठी कारणीभूत असलेल्या वृक्षांची अधिकाधिक लागवड करुन त्याचे संगोपन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, ह.भ.प. नामदेव चारठाणकर महाराज, उद्योजक राम भोगले, विवेक देशपांडे, प्रचार, प्रसिद्धी सल्लागार कुमार खेडकर, युनिसेफचे जयंत देशपांडे, संचालक (वासो) मुंबई सतीष उमरीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
            कार्यक्रमाच्या समारोपात जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी राज्याप्रमाणेच जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी  कुटूंबस्तर संवाद अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत हे काम केवळ अभियानापुरते न करता एक सामाजिक दृष्टीकोन ठेऊन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी म्हणाले की, जिल्ह्यात 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील 63 हजार कुटूंबियापर्यंत पोहोचून त्यांच्या गाठीभेठी घेत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार असून त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी आज या आगळयावेगळया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 420 गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी या अभियानात सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कार्यशाळेचे आभार प्रदर्शन जि.प.चे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी करुन उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली व या अभियानात सर्वांनी हिरिरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
            या अभियानादरम्यान वापरण्यात येणाऱ्या पोस्टर, हँडबील व घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.  सर्वप्रथम संत तुकडोजी महाराज व संता गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
            कार्यशाळेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ताठे, नम्रता गोस्वामी यांच्यासह सर्व टीमचा पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यशाळेस मराठवाड्यातील स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******* 




No comments:

Post a Comment