Monday 15 August 2016

सायबर गुन्हेगारांवर वचक बसवून गुन्ह्यांची तात्काळ उकल होण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार – पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना – महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत सायबर गुन्हेगारांवर वचक बसविण्याबरोबरच गुन्ह्यांची तात्काळ उकल होऊन आरोपींचा तातडीने शोध लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेले जालना जिल्हा सायबर लॅब  हे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात स्वतंत्र इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या जालना जिल्हासायबर लॅबचे उदघाटन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, अपर पोलीस अधीक्षक राहूल माकणीकर, लॅबचे प्रमुख व्ही.एच. इज्जपवार, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            या सायबर लॅबच्या माध्यमातून डाटा चोरणे, गोपनीय सांकेतिक चिन्ह चोरणे, इंटरनेटद्वारे फसवणुक करणे, बदनामी करणे, दहशतवादी कट रचणे, देशाविरुद्ध छुप्या पद्धतीने युद्ध पुकारणे, एटीएम संबंधित गुन्हे, आर्थिक फसवणुक, सोशल मिडियावर खोटे अकाऊंट करणे, हॅकींग करणे, मालवेअर तयार करणे आदी गुन्ह्यांना आळा घालण्यात येणार असून या लॅबमध्ये अत्याधुनिक अशी संगणक यंत्रणेबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विनालिफ्ट सॉफ्टवेअर, नेसा सॉफ्टवेअर, ॲडव्हीक सीडीआर. ॲनॅलिसीस सॉफ्टवेअर, सायबर चेक सुट सॉफ्टवेअर, मोबाईल चेक आदी सॉफ्टवेअर बसविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना‍ दिली.
            सर्वप्रथम कोनशिला अनावरण तसेच फित कापून पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते या सायबर लॅबचे उदघाटन करण्यात आले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, पोलीस विभागातील सर्व अधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******  


No comments:

Post a Comment