Monday 15 August 2016

राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी “अठरा लाख गृहभेटी” या उपक्रमांत सर्वांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा – पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना -  महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छतेसंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख गृहभेटी  हा उपक्रम राबविण्यात येणार असून या अभियानात सर्वांनी अधिकाधिक सहभाग नोंदवून राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.  
            भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या  69 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार संतोष सांबरे, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ताठे, श्री इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक              डॉ. सरिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जनतेला उद्देशुन संदेश देताना पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की,  राज्यात 7 हजार 314 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील 15 तालुके पूर्णत: हागणदारी मुक्त झाले असून चालु वर्षात राज्यातील 13 जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर अभियाना दरम्यान शौचालय नसलेल्या राज्यातील 18 लाख कुटूंबियांपर्यंत पोहोचून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री मंडळातील सर्व मंत्री, मुख्य सचिव, विविध खात्याचे सचिव तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व अधिकारी या अभियानांतर्गत प्रत्येकी एका गावास भेट देऊन कूटूंबस्तरावर शौचालयाचे महत्व पटवून देणार आहेत.  शासनाच्या या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            गेल्या तीन वर्षापासून सातत्याने अल्प प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत होते.  परंतू आता यावर्षी वरुणराजाची चांगली कृपा आपल्यावर होत असून आजपर्यंत अपेक्षित असलेल्या पावसाच्या 63 टक्क्यापेक्षा जास्त पाऊस जिल्ह्यात पडला आहे. त्यामुळे जायकवाडीसह जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आगामी काळात शेती, उद्योग व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
              राज्य शासन शाश्वत पाणी साठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार हे अभियान गतवर्षापासून राज्यात राबवित आहे. जालना जिल्ह्यात गतवर्षात 212 गावांची निवड करुन 412 सिमेंट बंधारे, 604 नाल्यांचे खोलीकरण आणि    3 हजार 214 बांध-बंधिस्तीची कामे करण्यात आली असून या कामावर 72 कोटी 55 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत.   या अभियानामुळे पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब साठविण्यात व अडविण्यात आला असून  याद्वारे 49 हजार 550 टी.सी.एम. एवढा पाणीसाठा निर्माण होऊन जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रुती आपणास पहावयास मिळत असल्याचे सांगत  चालू वर्षातही हे अभियान 186 गावातून राज्य शासनासह स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून राबविण्यात येत  आहे. येणाऱ्या काळातही जिल्ह्यातील सर्व गावात हे अभियान यशस्वीरित्या राबवून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.  या कामी सर्वांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
           नैसर्गिक आपत्तीमुळे गतवर्षात खरीप हंगामामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जवळपास  3 लाख 81 हजार शेतकऱ्यांना 221 कोटी 46 लक्ष रुपयांचे अनुदान त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच यावर्षी जिल्ह्यातील 1 लाख 62 हजार 239 शेतकऱ्यांना जवळपास 1 हजार 132 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करुन 102 टक्के वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. तसेच 23 हजार 531 शेतकऱ्यांच्या 217 कोटी 70 लाख एवढ्या पीककर्जाचे पुनर्गठण करण्यात आले असून पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार 475 कर्जदार शेतकरी व 45 हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले असल्याचेही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात घटत चाललेले वनक्षेत्र वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यात 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. जालना जिल्ह्याला या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 3 लाख 36 हजार वृक्षांची एकाच दिवशी लागवड करण्यात आली असून त्याचे संगोपनही करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड ही केवळ मोहिम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात, घराच्या व  कार्यालयाच्या परिसरात एक तरी वृक्षाचे रोपन करुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.  
            केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात 14 हजार 500 विद्युत खांबावर एलईडी लाईट लावण्यासाठी दिल्ली येथील ईएसएल या कंपनीशी शासनाचा करार झालेला आहे. या करारापोटी शहरात 10 हजार एलईडी लाईट उपलब्ध झालेले असून एलईडी लाईट बसवणारी जालना नगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            सध्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव प्रत्यारोपणापद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. सद्य:स्थितीत राज्यात सुमारे 12 हजार पेक्षा अधिक नोंदणीकृत रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत असून प्रतिदिन ही संख्या वाढत आहेत.  या रुग्णांना पुनर्जीवन देण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदानाचे महत्व आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज बनली आहे.  अवयव दानाचे महत्व लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयव दानाचा महोत्सव घेण्याच्या सुचना केल्या असून त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2016 दरम्यान अवयवदान महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.  आपण सर्वांनी या महोत्सवात हिरिरीने सहभाग नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील ग्रामीण दळणवळणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासन सतत प्रयत्नशिल आहे.  त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने अनयुटी तत्वावरील रस्त्यांसाठी प्रतीवर्षी 500 कोटीची तरतूद उपलब्ध करुन देण्याचे धोरण ठरविले असून या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने  1 हजार 343 कोटी रुपयांचा आराखडा शासनास सादर केलेला आहे.   तसेच केंद्रीय मार्ग निधीमधून 166 कोटी रुपयांची 9 कामे, अर्थसंकल्पीय तरतुदीमधुन 131 कोटी रुपयांची 97 कामे, नाबार्ड अंतर्गत 52 कोटी रुपयांची 47 कामे मंजूर करण्यात आली आहेत.
            राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटर अंतराच्या रस्त्यास केंद्र शासनाने मान्यता दिली असून केंद्रीय वार्षिक नियोजनात 860 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचेही पालकमंत्री श्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान, 2 कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत वृक्ष लागवड, स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरिक, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी यांचा तसेच महसुल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा, प्रचार व प्रसाराचे उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा, माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत कुटूंब नियोजनांतर्गत शस्त्रक्रिया केलेल्या मातांचाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            या कार्यक्रमाचे सुत्र संचलन निशिकांत मिरकले व तेजस्विनी माटोले यांनी केले.  कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***-**** 

No comments:

Post a Comment